बीड(रिपोर्टर): बीड विधानसभा क्षेत्रातील बोरखेड येथील संभाजी अर्जुन अष्टेकर (वय 23 वर्षे) तरूण शेतकरी बांधवाने कांद्याला व इतर पिकाला भाव नसल्यामुळे तसेच कुटुंबातील सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असल्याने आर्थिक संकटात सापडल्यामुळे दि.7 मार्च 2023 रोजी स्वत:च्या शेतामध्ये झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.
सदरील दु:खद घटनेमुळे व कर्ता पुरुष गेल्याने कुटूंब उघड्यावर पडले आहे. त्यांच्या कुटुंबाला शासन नियमानुसार तात्काळ आर्थसहाय्य प्राप्त होणे बाबत विभागाला आदेशीत करावे व सदरील घटनेचा अहवाल शासनास कळवावा या अपेक्षेसह तसेच बीड विधानसभा क्षेत्रातील बीड व शिरूर कासार तालुक्यातील तसेच जिल्ह्यामध्ये बहुतांश गावात दि.6 व 7 मार्च 2023 रोजी अवकाळी पावसाने व वादळी वार्याने मोठ्या प्रमाणात शेतातील पिकांचे व फळबागाचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतातील उभे असलेले पीक व फळबागांची मोठ्या प्रमाणात नासाडी झालेली आहे. नुकसान झालेल्या पिकांचे, फळबागांचे तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व नुकसानीचे सरसकट पंचनामे करणे बाबत विभागाला तात्काळ आदेशीत व्हावे अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, मुख्य सचिव,म.रा.मं.मुंबई मा.विभागीय आयुक्त,संभाजीनगर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.