कार्यकत्याने डोके आपटून फोडून घेतले, ईडीच्या कारवाईचे संतप्त पडसाद
कागल (रिपोर्टर) हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापा पडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते निवासस्थानाकडे येऊ लागले आहेत. कागल शहरातील मुश्रीफ यांच्या निवासस्थानाकडे जाणारे सर्व रस्ते स्थानिक पोलिसांनी नाकाबंदी करून रोखले आहेत. तसेच विशेष पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गैबी चौकातून मुश्रीफ यांच्या घराकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आल्याने निवासस्थानाकडे येणारे कार्यकर्ते गैबी चौकात रोखण्यात आले आले तर दुसरीकडे ईडीच्या या हाटवादी धोरणावर संतापून मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी ‘आम्हाला आणखी किती त्रास देणार, त्याऐवजी आम्हाला गोळ्या घालून मारून टाका’, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.
हसन मुश्रीफ यांच्या घरावर दुसर्यांदा ईडीने आज छापा मारला. पहाटेच्या दरम्यान मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर ईडीचे पथक धडकले तेव्हा घरामध्ये मुश्रीफ यांच्या पत्नीसह महिला व मुली होत्या. मुश्रीफ गरात नसल्याचे सांगूनही ईडीच्या अधिकार्यांनी घुसखोरी केल्याने त्या प्रचंड संतापल्या. जेव्हा ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या निवासस्थानात आल्याची माहिती कार्यकर्त्यांना झाली तेव्हा कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येत आहे. कागल तालुक्यातील कार्यकर्ते मुश्रीफ यांच्या निवासस्थानाकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत निवासस्थानासमोर कार्यकर्त्यांची गर्दी कायम होती. पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये सतत बाचाबाची होत आहे.
दरम्यान सागर दावणे या तरुणाने डोके आपटून घेऊन ईडीच्या कारवाईचा निषेध केला. यावेळी तो रक्तबंबाळ झाल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मुश्रीफ यांच्या निवासस्थानासमोर दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना केळीचे वाटप केले जात होते. जिल्ह्यातील आणि तालुक्यातील नेतेमंडळी निवासस्थाना समोर दाखल झाले आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून कार्यकर्ते निवासस्थानासमोर ठाण मांडून होते. महिला देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाल्या आहेत.
अनिल देशमुखांवर 109 वेळा छापेमारी, हसन मुश्रीफांविरोधात हा विक्रम ईडीला मोडायचा असावा -सुप्रिया सुळे
हसन मुश्रीफ यांच्यावर दोन महिन्यात तिसर्यांदा कारवाई झाली याचं काही आश्चर्य वाटत नाही. अनिल देशमुखांच्या प्रकरणात ईडी आणि सीबीआयने 109 वेळा छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांच्यावर छापेमारी करून ईडी आणि सीबीआयला हा विक्रम मोडायचा असावा ही शक्यता नाकारता येत नाही. हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी तिसर्यांदा गेली आहे तरीही पहिल्या दोन कारवायांमध्ये काय झालं? त्याची माहिती मिळत नाही हे दुर्दैव आहे असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की विरोधकांच्या विरोधात केंद्र सरकारने सातत्याने यंत्रणा राबवण्यास सुरूवात केली आहे. संविधानाच्या बाहेरच्या चौकटीत जाऊन हे सगळं सुरू आहे. हा प्रवास दडपशाहीच्या दिशेने सुरू आहे का? अशी शंका मला येऊ लागली आहे. आता ही शंका शंकेपुरतीच मर्यादित न राहता त्याच दिशेने केंद्र सरकार पावलं उचलत आहेत हे दिसून येतं आहे असंही सुप्रिया सुळेंनी मह्टलं आहे. अनिल देशमुख, संजय राऊत, एकनाथ खडसे, नवाब मलिक यांच्यावरही याच पद्धतीने अन्याय झाला आहे. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात झालेली ही कारवाई आता आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्षात आणून देऊ असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.
भाजपात सगळे धुतल्या तांदळाचे -नाना पटोले
एकीकडे मुश्रीफ समर्थक रस्त्यावर उतरले आहेत, तर दुसर्या बाजूला विरोधी पक्ष मुश्रीफांच्या सोबत उभे आहेत. या कारवाईवरून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भाजपावर टीका करू लागले आहेत. मुश्रीफ यांच्या घरांवरील ईडीच्या छापेमारीबद्दल विचारले असता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपा हे सगळं जाणीवपूर्वक करत आहे. त्यांचा विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण अनिल देशमुखांचं प्रकरण नुकतंच पाहिलं आहे. परमवीर सिंहांनी जे काही आरोप केले त्याची काही चौकशी झाली नाही.पटोले म्हणाले की, अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांचा आरोप केला होता. परंतु त्यांना या प्रकरणात कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एका निरपराध माणसाला दीड वर्ष तुरुंगात राहावं (पान 7 वर)
लागलं. त्यांच्यावर जे काही आरोप झाले त्यापैकी एकाही प्रकरणात ईडी किंवा सीबीआयकडून कारवाई झालेली नाही. परंतु अशा कारवाईनंतर जे लोक भाजपामध्ये गेले ते स्वच्छ झाले. यांच्याकडे (भाजपा) गेलेल्या लोाकंची चौकशी का झाली नाही? एबीपी माझाशी बोलताना पटोले यांनी सवाल केला की, भाजपात काय सगळे दुधाने धुतलेले लोक आहेत का?
मुलुंडच्या पोपटाला आधीच माहिती कशी असते? – राऊत
ईडीच्या कारवाया या सुडबुद्धीने सुरू आहेत. सदानंद कदम हे शिवसेनेमध्ये पदावर नसतील पण ते शिवसेना परिवाराचे सदस्य आहे तर हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत. कदम यांना काल अटक झाली मात्र त्यांच्या अटकेआधी त्यांना अटक होणार हे आमचे मुलुंडचे पोपट बोलत होते. सदानंद कदम यांना अटक करण्याचं कोणतही कारण नव्हता. खेहमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी करण्यामागे ज्या लोकांनी मेहनत घेतली त्यापैकी सदानंद कदम होते. त्यामुळे काल ईडीचे अधिकारी खेडला गेले, कदमांना अटक केली, त्यांना अटक केल्याची माहिती ईडीने देण्याऐवजी मुलुंडचा पोपट जाहीर करतो, याचा अर्थ काय? त्याला हे सर्व कसं माहित पडतं. हसन मुश्रीफांवरील एफआयआरची कॉपी सर्वप्रथम सोमय्यांना मिळते. राज्यात काय सुरू आहे?असं म्हणत या सर्व कारवाया बोगस असून महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर सुरू असल्याचे राऊतांनी म्हटले.