मुंबई (रिपोर्टर): अर्थसंकल्पीय अधिवेशनात सकाळच्या सत्रात मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने अनेक लक्षवेधी पुढे ढकलण्याची वेळ आली. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच संतापले. तुम्ही मंत्रिपदासाठी पुढे पुढे करता. आम्हाला मंत्री करा, यासाठी मागे लागता. परंतु, मंत्री झाल्यावर सभागृहाची परंपरा पाळत नाही, तुम्हाला नेमून दिलेलं वैधानिक काम करत नाही. अध्यक्षसाहेब हे अत्यंत गलिच्छपणाचे कामकाज चालले आहे. गैरहजर मंत्र्यांपैकी कोणालाही विधिमंडळाच्या कामकाजात रस नाही. यांना बाकीच्याच कामांमध्ये रस आहे. पण त्यांनी सभागृहातील कामाला महत्त्व देण्याची गरज आहे. आम्हाला बोलण्याची वेळ का येते? निर्ल्लजपणाचा कळस गाठला गेला की आमचाही नाईलाज होतो, अशा कठोर शब्दांत अजित पवार यांनी मंत्र्यांना फैलावर घेतले.
यावेळी संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील हेदेखील अजित पवारांच्या तडाख्यातून सुटले नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना रात्री दोन-अडीचपर्यंत जागून काम करायची सवय आहे. पण चंद्रकांत पाटील तर रात्री दोन-अडीचपर्यंत जागत नाहीत. त्यांनी तरी सकाळी लवकर उठून सभागृहात आले पाहिजे होते. ज्यांची लक्षवेधी होती त्या मंत्र्यांनीही सभागृहात उपस्थित राहिले पाहिजे होते. अनेकदा संसदीय कामकाज मंत्री सभागृहात नसतात. देवेंद्रजी आम्ही तुमच्याकडे सिनिअर म्हणून बघतो. तुम्ही उच्चविद्याविभुषित आहात, पण तुमचंही लक्ष नाही. तुम्ही तुमच्या मंत्र्यांना सांगा, असे अजित पवार यांनी म्हटले. आज आठ लक्षवेधी होत्या, पण सात लक्षवेधी मंत्री सभागृहात नसल्याने पुढे ढकलण्याची नामुष्की आलेय. अधिवेशनाचा एक एक दिवस कमी होतोय, असेही अजित पवार यांनी म्हटले.