मुंबई (रिपोर्टर): राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्या दिवसापासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींवर सध्या विधिंमडळात चर्चा चालू आहे. त्यासंदर्भात आज चर्चा चालू असताना सत्ताधारी बाकांवर मंत्री अनुपस्थित असल्यामुळे त्यावरून विधानसभेत खडाजंगी झाली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारला गांभीर्य नसल्याची टीका करत संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, धनंजय मुंडे यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्यानंतर भाजपानंही उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीचा मुद्दा मांडताच अजित पवारांनी त्यावरून भाजपाला सुनावलं.
नेमंक काय घडलं?
विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात ठराव मांडत असताना सत्ताधारी बाकांवर मंत्रीच अनुपस्थित असल्याची बाब धनंजय मुंडेंनी निदर्शनास आणून दिली. यावेळी सरकारला गांभीर्य नसल्याचा आरोप त्यांनी केला. जेव्हा विरोधी पक्षनेते 293 चा ठराव मांडतात, तेव्हा किमान मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी थांबायला हवं. आत्ता इथे फक्त एक सहकारमंत्री आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारे विरोधी पक्षनेत्यांसहित विरोधी बाकांवरच्या सदस्यांचा अपमान होत असेल, तर इथे विरोधी पक्षांनी का बोलायचं? सगळे मंत्री लॉबीमध्ये बसले आहेत. याचं सरकारला काहीही गांभीर्य नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना काहीही गांभीर्य नाही, असं धनंजय मुंडे यावेळी सभागृहात म्हणाले.
समोरचं पहिलं बाकडं तर रिकामंच असतं – अजित पवार
यापाठोपाठ विरोधी बाकांवरून हा महाराष्ट्राचा, जनतेचा अपमान आहे, अशा घोषणा केल्या जाऊ लागल्या. त्यावर अजित पवारांनीही सरकारवर तोंडसुख घेतलं. मी अधिवेशन सुरू झाल्यापासून सांगतोय की यांना गांभीर्य नाही. आम्ही तर काही शब्द असे वापरतो की आम्हालाही मनाला वाईट वाटतं. पण अक्षरश: भोंगळ कारभार चालू आहे. कुणीही गंभीर नाही. पहिलं बाकडं तर मोकळंच असतं. त्यावर कुणीही नसतं. आम्हीही सरकार चालवलंय, अशा शब्दांत अजित पवारांनी सत्ताधार्यांना सुनावलं.