2022-23 मध्ये 200 ऐवजी आता 300 उमेदवार घेणार यूपीएससीचे प्रशिक्षण
मुंबई (रिपोर्टर) सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) मार्फत दिल्ली येथे अनुसूचित जातीतील निवडक 200 विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारी साठी मोफत विशेष प्रशिक्षण दिले जाते. ही संख्या 100 ने वाढवून 300 करण्याचा निर्णय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.
दरवर्षी बार्टी मार्फत विशेष चाचणी परिक्षा घेऊन यूपीएससी परीक्षेची पूर्वतयारी करणार्या 200 विद्यार्थ्यांना दिल्ली येथे मोफत प्रशिक्षणासाठी निवडले जाते. दिल्ली येथे नामांकित प्रशिक्षण केंद्रात प्रवेश तसेच सदर उमेदवारांना निवास व भोजन व्यवस्था देखील बार्टी मार्फत पुरवली जाते. मागील दोन वर्षात लॉकडाऊन काळात देखील उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. ऑनलाइन प्रशिक्षण पद्धतीला आत्मसात करत बार्टी मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादित केले होते. बार्टीचे 2020 साली 9 तर 2021 साली 7 उमेदवार यूपीएससी उत्तीर्ण होऊन अधिकारी बनले आहेत. याचाच विचार करून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशिक्षणासाठी निवड होणार्या विद्यार्थी संख्येत 100 ने वाढ केली असून, यावर्षी तब्बल 300 विद्यार्थी यूपीएससी परीक्षेचे प्रशिक्षण घेणार आहेत.सदरच्या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी असे आवाहन महासंचालक गजभिये यांनी केले आहे.