बीड बाजार समितीत तह तडजोड की गनिमी कावे?
कोण कोणाच्या काफिल्यात? तालुकाभरात चर्चा
बीड (रिपोर्टर) दोन वर्षांपासून निवडणुकांना आसुसलेल्या इच्छुकांसह बघ्यांच्या हाती कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आल्याने या निवडणुकीकडे पक्ष, नेते, कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक चर्चीत असलेल्या बीड बाजार समितीत तह, तडजोड, गनिमी कावा सुरू झाला असून दिवसा आणि रात्री कोण कोणाच्या काफिल्यात जातय याकडे करडी नजर नेत्यांची असल्याचे बोलले जातेेय. या निवडणुकीची तालुकाभरात चर्चा होत असून प्रथमदर्शी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आ. संदीप क्षीरसागर आणि भाजप व शिंदे गट यांचा प्रत्येकी एक पॅनल निवडणूक रिंगणात उतरला आहे. दुसरीकडे चाळीस वर्षांपासून सत्तेत असलेल्या जयदत्त क्षीरसागरांच्या ताब्यातून बाजार समिती काढण्याहेतू विरोधक एकत्रित येण्याची चर्चा करत असून जागा वाटपात त्यांचा घोडा अडल्याचे बोलले जातेय. 20 तारखेला उमेदवारी अर्ज परत घेण्याचा दिवस असून यादिवशी एकास एक की एकास दोन हे दिसून येणार आहे.
बीड बाजार समितीवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा गेल्या 40 वर्षांपासून वरचष्मा आहे मात्र गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात जयदत्त क्षीरसागर यांच्या हातातून काही संस्था निसटताना दिसून आल्या आहेत. आ. संदीप क्षीरसागर हे त्यांना शह देत असून शहरातले अन्य राजकीय विरोधकही जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात मोट बांधताना दिसून येत आहेत. बीड बाजार समिती निवडणुकीसाठी एकास एक उमेदवार देण्याची जयदत्त क्षीरसागर यांच्या सर्वच उमेदवारांची चर्चा सुरू आहे. संदीप क्षीरसागर, ठाकरे गटाचे जगताप, काँग्रेस शेतकर्यांचे काही उमेदवार असे मिळून एक पॅनल तयार झाला आहे. तर भाजपचे राजेंद्र मस्के, शिंदे गटाचे कुंडलिक खांडे यांनीही आपला एक पॅनल उभा केला आहे. मात्र भाजप आणि शिंदे गटाचा तिसरा पॅनल हा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांना मदत करण्यासाठी उभा केल्याचा आरोप शिंदे गटातीलच एकाने केल्यानंतर आता जयदत्त क्षीरसागर विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यामुळे बीड बाजार समितीत तिरंगी लढत होतेय की दुरंगी हे येत्या पाच दिवसात दिसून येईल मात्र तह-तडजोड-गनिमी कावे या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहेत.