बीड भाजपा पदाधिकार्यांनी प्रवीण दरेकरांची साधी भेटही घेतली नाही, बीडमध्येही काळे झेंडे दाखवण्याची तयारी
बीड (रिपोर्टर) भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना विधान परिषद निवडणुकीत डावलल्यानंतर महाराष्ट्र भाजपा आणि बीड भाजपात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत असून रात्रीपासून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बीडमध्ये डेरेदाखल असताना भाजपाचा साधा एकही पदाधिकारी त्यांच्यापर्यंत अद्याप गेला नाही. उलट आज सकाळी उस्मानाबादहून बीडकडे येताना चौसाळा येथे दरेकरांच्या गाडीचा फौजफाटा भाजप कार्यकर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी उभा राहिला नसल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी दरेकरांसह भाजपाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला तर बीडमध्ये दरेकरांना काळा झेंडे दाखवण्याची तयारी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ठेवल्याचे वृत्त आहे.
शिवसंग्रामचे सर्वेसर्वा आ. विनायक मेटे यांनी आयोजीत केलेल्या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे रात्री मुक्कामी बीडमध्ये होते. पक्षाचा एक वरिष्ठ नेता बीडमध्ये आल्यानंतरही भाजपाच्या कुठल्याही पदाधिकार्याने दरेकर यांची भेट घेतली नाही. आज सकाळी एका कार्यक्रमासाठी दरेकर हे उस्मानाबादला गेले, परत ते सकाळी अकरा वाजता बीडसाठी निघाले. साडेबारा वाजण्याच्या सुमारास दरेकरांचा ताफा हा चौसाळा येथे आला. त्यावेळी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी तो ताफा अडवून निवेदन देण्याचा प्रयत्न केला मात्र दरेकरांचा ताफा थेट पक्षाच्या कार्यकर्त्यांना डावलून बीडकडे निघाला. त्यानंतर संतापलेल्या चौसाळा येथील कार्यकर्ते प्रदीप बांगर यांच्यासह पंधरा ते वीस कार्यकर्त्यांनी दरेकरांविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. पंकजाताईंना जाणीवपुर्वक डावलले जात असल्याचा आरोप करत घोषणबाजीचा व्हिडिओ व्हायरल केला. बीडमधील कार्यकर्ते आणि पदाधिकारीही प्रवीण दरेकरांना भेटले नाहीत. त्यामुळे बीड जिल्ह्याची भाजप राज्य भाजपाच्या नेतृत्वाविरुद्ध आक्रमक झाली आहे.