भाजप, शिवसंग्राम, काँग्रेस, शेतकरी पुत्रही संदीप यांच्या गोटात
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर बाजार भरवणे होणार अवघड
बीड (रिपोर्टर) गेल्या 40 वर्षांपासून बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकहाती सत्ता गाजवणारे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना त्यांचेच पुतणे आ. संदीप क्षीरसागर यांनी कडवे आव्हान उभे करत काकांचा बाजार उठवण्यासाठी पुतण्याने भाजप, शिवसंग्राम, काँग्रेस, शेतकरी पुत्र आणि दोन्ही शिवसेनेला एकत्रित करत एकीचा साज घातल्याने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांसमोर कडवे आव्हान उभे राहिले असून जयदत्त क्षीरसागरांना यावर्षी एकहाती बाजार भरवणे अवघड झाल्याचे बोलले जात आहे. संदीप क्षीरसागरांनी घातलेल्या सादेत सर्वच विरोधकांनी ओ देत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती वाचवणे एवढाच अजेंडा आम्हा सर्वांचा असल्याचे ते सांगत असून त्यांच्या या अजेंड्याला मतदारही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
राज्याच्या राजकारणात शिंदे सेना आणि उद्धव सेना यांच्यात प्रचंड वितुष्ट असताना बीडमध्ये मात्र शेतकर्यांच्या भल्यासाठी दोन्ही सेनेचे प्रमुख एकाच गोटात गेले आहेत. आ. संदीप क्षीरसागरांसह अन्य विरोधकांना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या हातून कुठल्याही परिस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती काढणे आणि शेतकर्यांना न्याय देणे हेच महत्वाचे वाटत असल्याने भाजप-शिंदे सेना-उद्धव सेना – शिवसंग्राम – काँग्रेस- शेतकरी पुत्र एकत्रित आले आहेत. जागा वाटपात भाजपाला दोन, शिंदे सेना 2, उद्धव सेना 2, शिवसंग्राम 2, काँग्रेस 1, शेतकरी पुत्र 1 व अन्य जागांवर आ. संदीप क्षीरसागरांसह राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांचे उमेदवार (पान 7 वर)
रिंगणात उतरले आहेत. गेल्या चाळीस वर्षांपासून बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर जयदत्त क्षीरसागर यांची हुकुमत आहे. शेतकर्यांच्या अडचणी सोडवण्यापेक्षा शेतकर्यांना अधिक अहचणीत कसे टाकता येईल हेच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचे धोरण असल्याचा आरोप सर्वच विरोधकांनी केला आहे. बाजार समितीत झालेला महाप्रचंड उडद घोटाळ्यासह अन्य घोटाळे गेल्या 40 वर्षांच्या कालखंडात बाजार समितीत झाले आहेत. आता या सर्वांचा हिशोब चुकता करण्याइरादे माजी मंत्री क्षीरसागरांविरोधात विरोधकांनी मोट बांधल्याचे सांगण्यात येते. सर्वच पक्ष एकत्रित आल्याने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांना बाजार समितीवर आपल्या हुकमाचा बाजार भरवणे यावर्षी अवघड दिसून येत असून विरोधकांच्या वज्रमुठीला मतदारातूनही साथ मिळत आहे.
जयदत्त क्षीरसागरांची व्यूहरचना
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विरोधक एकवटत असल्याचे पाहून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर कधी नव्हे ते या निवडणुकीत आक्रमक होताना दिसले. विरोधकांवर हल्लाबोल करताना कडवे टिकास्त्र सोडू लागले. त्यापाठोपाठ गेल्या महिनाभरापासून जयदत्त क्षीरसागरांनी या निवडणुकीत विजय प्राप्त करून घेण्यासाठी जी व्यूहरचना आखली आणि महिनाभरापासून प्रचार सुरू ठेवला या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू असणार आहेत.
राज्यात कटुता, बीडमध्ये एकत्र
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गट यांच्यात कमालीचा असंतोष असताना बीडमध्ये मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचीं शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकत्रित आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.