बीड, (रिपोर्टर):- मुस्लिम धर्मीयांची पवित्र रमजान ईद (ईद-ऊल-फित्र) आज उत्साहात साजरी करण्यात आली. बीड शहरातील हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज ईदगाहसह मस्जिदमध्ये अदा केली. नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह येथे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यासह सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शविली होती. ईदची नमाज अदा झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगण देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. बीड शहरासह जिल्हाभरातही ईद मोठ्या उत्साहात साजरी झाली असून त्या-त्या वेळेनुसार तालुकाभरात ईदची नमाज अदा करण्यात आली. ठिकठिकाणी शांती अमन आणि नैसर्गिक आपत्तीपासून सर्वांना दुर ठेवण्याची दुवॉ मागण्यात आली.
दि. 24 मार्चपासून पवित्र रमजान महिन्याला सुरूवात झाली. कडक उन्हामध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्धांनी एक महिन्याचे उपवास पुर्ण केले. रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर आज ईद (ईद-ऊल-फित्र) उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील नाळवंडी रोड आणि बालेपीर परिसर या दोन्ही ईदगाहमध्ये मुस्लिम बांधवांनी सकाळी नियोजित वेळेनुसार ईदची नमाज अदा केली. त्याचबरोबर मस्जिदमध्येही ईदची नमाज झाली. नमाज झाल्यानंतर मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी दोन्ही ईदगाहस्थळी विविध राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासनाचे अधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित होते. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलींगण देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हाभरातही ईदची नमाज नियोजित वेळेनुसार अदा करण्यात आली.