गणेश सावंत
मो. नं. 9422742810
कुस्ती जिंकण्यासाठी कुस्तीतले पहेलवान एक ना अनेक डाव टाकतात परंतु राजकारणातल्या कुस्तीत शरद पवार असा एक डाव टाकतात की, समोरच्याचा धोबीपछाड झाल्याशिवाय राहत नाही. शरद पवारांचं राजकारण चांगल्या चांगल्याला कळलं नाही, उमजलं नाही, पवार हे सातत्याने बेरजेच्या राजकारणाला अधिक महत्व देतात म्हणूनच सत्ता नाही तर राजकारण नाही आणि राजकारण नाही तर सत्ता नाही, असे उघडपणे म्हटले जाते. महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास लिहायचा असेल म्हणण्यापेक्षा साधा निबंध लिहायचा असेल तर शरद पवारांना वगळून चालणार नाही. शरद पवारांच्या विरोधातही लिहायचं असेल ऐंशी टक्के त्यांच्या बाजुने लिहावं लागेल, महाराष्ट्राच्या राजकारणात घडणार्या चांगल्या-वाईट घडामोडींना आजपर्यंत कुठून ना कुठून शरद पवारांच्या विचाराची अथवा निर्णयाची किंवा मार्गदर्शनाची झालर असतेत. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत अथवा राज्य आणि देशातल्या कुठल्याही पक्षाचा नेता असो तो शरद पवारांकडे मार्गदर्शक म्हणूनच पाहतो. त्याच शरद पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्षपद सोडले तेव्हा पक्षात आणि देशात जी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्या परिस्थितीवर अनेकांनी भाष्य करताना भाजपासोबत जाण्यासाठी हा पवारांचाच डाव म्हटलं. परंतु शरद पवारांच्या मनात काय? हे आजपर्यंत कुणालाही लक्षात येत नाही. ते जे अनपेक्षित निर्णय घेतात ते निर्णय भावनिक नसतात, त्या निर्णयाला बुद्धी आणि तर्काची जोड असते. शरद पवारांचं गेल्या 60 वर्षाचं राजकारण आणि सत्ताकारणाचं गणित पाहितलं तर ते केव्हा काय करतील हे सांगता येत नाही. म्हणूनच त्यांना
दगलबाज पवार
म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. इथे ‘दगलबाज’चा अर्थ दखलपात्र घेतला तर अधिक बरे होईल. दगलबाजचा अर्थ गनिमी कावा म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. शरद पवारांनी आपल्या उभ्या आयुष्यात बेरजेचं राजकारण करताना जे राजकीय चढउतार पाहिले आणि त्या राजकीय चढउतारात सरस ठरले, त्याची सुरुवात इ.स. 1977 सालापासून झाली. जेव्हा काँग्रेस फुटली, दोन तुकडे झाले तेव्हा काँग्रेस आय आणि काँग्रेस यु या दोन काँग्रेसमधले शरद पवारांनी काँग्रेस यु पसंत केली. मात्र अवघ्या काही दिवसात काँग्रेस युलाही झटका देत शरद पवारांनी जनता पार्टीच्या मदतीने पुलोदचे सरकार बनवले. हे शरद पवारांच्या यशस्वी राजकारणाचं पहिलं आणि सर्वात मोठं पाऊल म्हणता येईल. त्यानंतर 1999 साली सोनिया गांधी पंतप्रधान पदाच्या उमेदवार होणार तेव्हा शरद पवारांनी प्रथम बंड पुकारलं आणि काँग्रेसमधून बाहेर पडत प्रफुल्ल पटेल, संगमा यांच्यासह अन्य लोकांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केली. इथे शरद पवारांना स्वत:च्या बळावर महाराष्ट्र मिळवता आला नाही. परंतु शरद पवारांशिवायही कुणालाच महाराष्ट्र मिळाला नाही, म्हणून पुन्हा काँग्रेस सोबत जाऊन शरद पवारांनी 15 वर्षे महाराष्ट्रात सत्ताकारण केलं. या चाळीस वर्षांच्या कालखंडामध्ये शरद पवारांचं राजकारण हे समजण्यापलिकडचे. देशात आणि राज्यात शरद पवारांशिवाय राजकीय स्थैर्य निर्माण होऊच शकत नाही हे उघड असताना जेव्हा वैचारिकतेच्या शेवटच्या पानावर पवारांना अस्थिर करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा पवार तेल लावलेल्या पहेलवानागत मैदानात उतरल्याशिवाय राहत नाहीत. तसे त्यांनी आपल्या राजीनाम्यातून आपण पुन्हा मैदानात उतरल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे
शरद पवार
भाजपा सोबत जाणे
याला पुर्णविराम मिळतो. यापुढेही शरद पवार भाजपासोबत जाणारच नाहीत, हे तेव्हा स्पष्ट होते जेव्हा ‘लोक माझ्या सांगाती’ या पुस्तकाच्या दुसर्या भागात शरद पवार काही महत्वाचे मुद्दे तर मांडतातच, परंतु भाष्यही करतात. ते म्हणतात… महाविकास आघाडीचे सरकार केवळ सत्तेचा खेळ नाही, अन्य पक्षांना दाबून त्यांचे महत्व कशा ना कशा पद्धतीने कमी करून भाजप स्वत:चे राजकीय वर्चस्व निर्माण करत आलं आहे. त्या भाजपाला ‘महाविकास आघाडी सरकार’ ही जबरदस्त चपराक आहे, कडवा जवाब आहे. पवार जर या पद्धतीने भाजपावर भाष्य करत असतील तर त्यांचं भाजपासोबत जाणं शक्य नाही हे आम्ही तरी मानू. पुढे याच पुस्तकाच्या 319 व्या पानावर लिहितात… ‘महाविकास आघाडी सरकार भाजपाला देशातले सर्वात मोठे आव्हान आहे’, हे सरकार पाडण्याचे पुर्ण प्रयत्न होतील, याची पुर्ण कल्पना मला होती. आम्ही आमच्या पद्धतीने त्याला तोंड द्यायलाही सक्षम होतो, परंतु उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवल्याने शिवसेनेत एवढे मोठे वादळ निर्माण होईल याचा अंदाज नव्हता. ते वादळ शांत करण्यात शिवसेना आणि कंसामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे कमी पडले. त्यात संघर्ष न करता उद्धव यांनी राजीनामा दिल्याने आघाडी सरकारला पुर्णविराम मिळाला. शरद पवारांच्या आत्मचरित्रातले हे दोन मुद्दे लक्षात घेतले तर पवार हे भाजपासोबत जाण्याबाबत अनुकूल नव्हते, परंतु
‘मी पुन्हा येईल’
चा नारा महाराष्ट्रात सातत्याने गुंजत आला. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्याला पुर्णविराम मिळाला. मात्र पुन्हा शिवसेनेत फुट पडली अन् ‘मी पुन्हा येईल’च्या नार्याचा जयजयकार झाला. मात्र इथेही शिंदेशाही टकमक टोकावर असताना देवेंद्र फडणवीस ‘पुन्हा येईल’ची भाषा करतात तेव्हा सत्ताकारणासाठी केंद्रातले मोदी-शहा महाराष्ट्रात पुन्हा एकाधिकारशाही पद्धत राबवत ईडी-काडीच्या माध्यमातून थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीला छेद देण्याचा इरादा बाळगतात. मग 2019 ची पहाटेची शपथविधी असो अथवा त्यानंतर अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याबाबतचे वक्तव्य शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर ‘तुम्हाला दुसरा अध्यक्ष का नकोय?’ ही भाषा ‘मी पुन्हा येईल’ ला ऊर्जा देणारी होती. भलेही सत्ताकाररासाठी नको परंतु ईडीकाडीच्या भीतीने का ना होईना अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या खेम्यातले प्रफुल्ल पटेल, अनिल देशमुख, छगन भुजबळ यांच्यासह अन्य काही ईडीपीडीत नेत्यांच्या बळावर भाजप प्रबळ होऊ शकेल हे लक्षात आल्यानंतर शरद पवारांनी आपला डाव टाकला. तो डाव
एकतर कड्यावरून
उड्या टाका
नाही तर शत्रुसोबत लढून मरा सारखा म्हणावा लागेल. सह्याद्रीच्या कड्यांना हे नवे नाही. जेव्हा ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे’ म्हणत तानाजी मालुसरे उदयभानावर चालून गेले आणि लढता लढता ते वीरगतीला प्राप्त झाले तेव्हा महाराजांची फौज सैरावैर झाली अन् पाठ दाखवून पळू लागली तेव्हा तानाजींचे बंधू आणि मामांनी गडाचे दोर कापले. मावळ्यांना ‘तुमचा बाप तिथं मरून पडलाय आणि तुम्ही पाठ दाखवून पळताय, एकतर कड्यावरून उड्या मारून मरा नसता लढून मरा’, असे म्हटले तेव्हा त्वेषाने मावळे लढले, उदयभानाचा खात्मा केला. कोंढाणा जिंकला. त्याच पद्धतीने ईडीपिडीच्या भितीने राष्ट्रवादीच्या काठावर असलेल्या नेत्यांना संदेश देण्याइरादे शरद पवारांनी आपले राजीनामा अस्त्र उगारले आणि त्या राजीनाम्यातून एक संदेश दिला, ‘पवारांविना राष्ट्रवादी अथवा पवारांविना सत्ताकेंद्र स्थापीत करत असाल तर करा’ राष्ट्रवादीपासून दूर जाणार्या काठावर असणार्यांना जेव्हा शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष नसतील तेव्हा राष्ट्रवादीचे अस्तित्व कायम राहिल का? हे प्रश्न मनी येणे साहजिक होते, तसे राष्ट्रवादीच्या काठावर असलेल्या फुटीरवाद्यांना जे भाजप घेऊ इच्छित होते त्या भाजपाचे हातही 2019 च्या पहाटे चांगलेच पोळलेले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या काठावर असलेल्या अजित पवारांसह अन्य नेत्यांना स्वीकारून सत्ताकेंद्र प्रस्थापीत करणे इतके सोपे नाही, हेही त्या राजीनाम्यात प्रमुख सुत्र होते. शरद पवारांचं राजकारण चांगल्या चांगल्यांना समजत नाही आणि शरद पवारांनी टाकलेल्या डावात समोरचा मल्ल पाठ लोळवून घेतल्याशिवाय राहत नाही, हा शरद पवारांचा धोबीपछाड घरच्यांना आणि बाहेरच्यांना नक्कीच होता.