नागपूर (रिपोर्टर) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजपासून नागपूरच्या दौर्यावर आहेत. ते नुसते दौर्यावर नाहीत तर प्रत्येक तालुका पिंजून काढणार आहेत. त्यांनीच याबाबत माहिती दिली.
कर्नाटकमध्ये भाजपला काँग्रेसने धूळ चारली, मागे झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुका आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे तयार झालेलं वातावरण; या सगळ्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांच्या दौर्याला विशेष राजकीय अर्थ आहे. नागपूरमध्ये भाजपविरोधी लाट तयार होत असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे जागं झालेल्या फडणवीसांनी विशिष्ट प्रकारचा नागपूर दौरा आखला आहे. त्यामध्ये ते प्रत्येक विधानसभा मतदारसंघ आणि तालुका पिंजून काढतील. या दौर्यामध्ये आपण शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी बोलतांना सांगितलं. ते म्हणाले की, दोन दिवसांमध्ये चार मतदारसंघ पूर्ण होतील. इतरही दोन मतदारसंघ त्यानंतर पूर्ण करु. जिल्ह्यातल्या सहाही मतदारसंघात जावून आढावा घेणार असून सगळे तालुके आणि सगळ्या नगर पालिका कव्हर करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.’सरकारच्या योजना इफेक्टिव्हली सामान्यांपर्यंत पोहोचवता याव्यात यासाठी आपण प्रयत्न करत आहोत’ असं म्हणून त्यांनी फक्त सावनेर आणि काटोलच नाही तर सहाही मतदारसंघात फिरणार असल्याचं सांगितलं.