परळी (रिपोर्टर) याआधी परळीमध्ये बाळासाहेबांसोबत आलो होतो आता सुषमा अंधारे यांनी परळीत आणल्याचे सांगत स्व. गोपीनाथराव मुंडे यांची आज प्रचंड आठवण येत असल्याचे खा. संजय राऊत यांनी म्हटले. मुंडे यांनी सातत्याने सेना-भाजपात एकी राहावी यासाठी प्रयत्न केल्याचेही त्यांनी म्हटले. आज राऊत यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी जावून समाधीचे दर्शन घेतले. सायंकाळी बीड येथे महाप्रबोधन यात्रेचा समारोप होणार असून ठाकरे गटाच्या दोन तोफा बीडमध्ये धडाडणार आहेत.
बीड शहरातल्या माने कॉम्प्लेक्स भागात आज सायंकाळच्या दरम्यान ठाकरे गटाच्या प्रबोधन यात्रेनिमित्त जाहीर सभा होत आहेत. यामध्ये खा. संजय राऊत यांच्यासह सुषमा अंधारे या सभास्थळी उपस्थित शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी खा. संजय राऊत हे बीड जिल्ह्यात डेरेदाखल झाले असून आज दुपारी ते परळीत आले. या ठिकाणी शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. परळीत आल्या आल्या खा. राऊत यांनी गोपीनाथ गडावर जावून स्व. मुंडेंच्या समाधीचे दर्शन घेतले. तेथून त्यांची हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत शहरातून रॅली निघाली. प्रभू वैद्यनाथाचे दर्शनही संजय राऊत यांनी घेतले. या वेळी बोलताना राऊत म्हणाले, याआधी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत परळीमध्ये आलो होतो, आता सुषमाताई यांनी आपल्याला परळीत आणले. परळीत आले की, स्व. गोपीनाथराव मुंडे यांची आठवण येते. त्यांचे आणि आपले अत्यंत जवळचे नाते होते, संबंध होते. स्व. मुंडेंनी सेना-भाजपात एकोपा रहावा, यासाठी त्यांचे मोठे योगदान असल्याचेही राऊत यांनी म्हटले. मुंडेंच्या अनेक आठवणींना उजाळा देत उपस्थित शिवसैनिकांना काही सूचना केल्या.
महाप्रबोधन यात्रा भव्यदिव्य होणार
हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा-अनिल जगताप
उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी आणि पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभरात महाप्रबोधन यात्रा आयोजित करण्यात आली असून याची शेवटची सभा आज संध्याकाळी बीड शहरामध्ये होत आहे. ही सभा भव्यदिव्य होणार असून या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे. आज सायंकाळच्या दरम्यान शहरातील माने कॉम्प्लेक्स या ठिकाणी महाप्रबोधन यात्रेची सभा होत आहे. या यात्रेला खा.संजय राऊत आणि सुषमा अंधारे मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील शिवसैनिक यात्रा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. या सभेला जिल्हाभरातील हजारो शिवसैनिक उपस्थित राहणार असून सभा भव्य दिव्य होणार असल्याचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी म्हटले आहे.