बीड (रिपोर्टर) ठाकरेंच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा बीडमध्ये डेरेदाखल झाली अन् बीडमधील शिंदे गट अॅक्टीव्ह मोडवर आला. ठाकरे आणि शिंदे यांच्यात राज्यभर तू तू मै मै चे पडसाद सातत्याने उमटतात. इथे मात्र ठाकरे गटाच्या अंतर्गत वादाचा फायदा शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सचीन मुळुक यांनी घेत आप्पासाहेब जाधवांना काही कळण्याअगोदर जाळ्यात ओढत व्हिडीओ काढण्यास भाग पाडले अन् ठाकरे गटाचा अंतर्गत वाद महाराष्ट्राच्या चव्हाट्यावर आला. सचीन मुळुक यांनीच या सर्व प्रकरणाला हवा दिल्याची जोरदार चर्चा बीडमध्ये होत आहे.
दोन दिवसांपूर्वी माने कॉम्प्लेक्स परिसरात ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव आणि गणेश वरेकर यांच्यात वाद झाला. मारामारी झाली. हे प्रकरण चेतते ठेवण्याइरादे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सचीन मुळुक यांनी काहींच्या माध्यमातून आप्पा जाधव यांना उचकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आप्पा जाधव यांनी एक -दोन व्हिडिओ काढले, ते विशिष्ट लोकांना दाखवले आणि त्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल केला. या व्हिडिओमध्ये सुषमा अंधारे लाच घेतात, त्यांना दोन चापट मारल्याचा दावा जाधव यांनी केला आणि इथेच ठाकरे गटाचा अंतर्गत वाद महाराष्ट्राच्या चव्हाट्यावर गेला. यापुढे जात सचीन मुळुक यांनी या प्रकरणाला हवा देण्यासाठी अंधारेंच्या यजमानांना बीडमध्ये आणले. पत्रकार परिषद घेऊन पुन्हा पुन्हा ठाकरे गटातल्या अंतर्गत वादाची चर्चा घडवून आणली. या पत्रकार परिषदेत शिंदे गटाने आप्पा जाधव यांच्या कुकर्माची आणि कुकर्तृत्वाचा निषेध केला असला तरी या घटनाक्रमामुळे शिवसेनेतल्या अंतर्गत गटबाजी आणि लाचखोरीची चर्चा राज्यभरात होऊ लागली. एकप्रकारे मुळुक यांनी या प्रबोधन यात्रेत मोठे विघ्न आणल्याचे बोलले जाते. मुळुक यांनी संबंधित घटनेचा निषेध केला असला तरी आप्पा जाधव यांना उचकवण्यात आणि जाळ्यात अडकवण्यात मुळुक यांना यश आले आणि तिथेच शिवसेनेच्या गोटात वादाची काडी पडली.