बीड (रिपोर्टर) ठाकरे सेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आप्पा जाधव यांनी थेट पक्षाच्या नेत्यांवर आरोप आणि मारहाणीचा दावा केल्यनो त्यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने बीडच्या जिल्हाप्रमुखपदासाठी निष्ठावाणाची शोधाशोध करत केज तालुक्यातील 25 वर्षांपासून शिवसेनेची निष्ठावंतपणे सेवा करणार्या रत्नाकर शिंदे यांची नूतन जिल्हाप्रमुखपदी घोषणा करत निष्ठावंताला न्याय दिल्याने केज तालुक्यासह जिल्ह्यात शिवसैनिकात जल्लोष साजरा केला जात आहे.
बीड येथे महाप्रबोधन यात्रेची सांगता होती. यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ठाकरे गटाचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आप्पा जाधव यांनी वाद निर्माण करत एक व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यानुसार जाधव यांची पक्षाने तडकाफडकी हकालपटटी केली. नवीन जिल्हाप्रमुख म्हणून कोणाची निवड होणार याकडे जिल्हाभरातील शिवसैनिकांचे लक्ष लागून होते. आज शिवसेनेने रत्नाकर शिंदे यांची जिल्हाप्रमुखपदी निवड जाहीर केली. शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम करत आहेत. केज तालुक्यातील ते पिंपळगाव या गावचे आहेत. इ.स. 1990 पासून ते बालशिवसैनिक म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन खांद्यावर भगवा ध्वज घेतला. तेव्हापासून ते आजपावेत त्यांनी शिवसेनेचे विविध पद भूषविले. 1990 साली शाखा सचिव, 2001 साली शाखाप्रमुख, 2002 साली तालुकाप्रमुख ते आजपयर्ंत ठाकरेंच्या शिवसेनेत एकनिष्ठतेने काम करत आले आहेत. या कार्यकाळामध्ये त्यांच्यावर आंदोलनादरम्यान अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. चारवेळेस ते जेलमध्ये गेले आहेत. त्यांच्याविरुद्ध तत्कालीन सरकारने झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत कारवाई केल्याने हर्सूल ठाणे, नाशिक, आर्थर रोड जेलमध्ये रत्नाकर शिंदे हे तब्बल दोन ते अडीच महिने होते. या दरम्यान शिवसेनेसह शिंदे कुटुंबिय त्यांच्या पाठीशी उभे राहिले. शिंदे यांच्या एकनिष्ठतेला आज अखेर फळ आले असून ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्या गळ्यात जिल्हाप्रमुखपदाचा रत्नहार टाकला आहे.