घर म्हटलं की, घरात भांड्याला भाडं लागणारचं. महाआघाडी ही एक घरासारखीच आहे. तीन पक्षाचे नेते कधी, कधी दिशा चुकल्यासारखे बोलत असतात. संसार करायचा झाला तर त्याला समजुतदारपणा तितकाच महत्वाचा ठेवावा लागतो. वाद वाढवण्या ऐवजी तो शमवण्याची तयारी ठेवली तरच कुठलीही गोष्ट साध्य होत असते. तीन पक्षांचे एकत्रीत येणं ही तिन्ही पक्षांची गतवेळी मजबुरी होती. पाच वर्ष या तिन्ही पक्षांना सत्ता राखता आली नाही. शिवसेना फुटल्याने हे तीन पक्षाचं सरकार गेलं. आमदार फुटल्यामुळे नैतिका म्हणुन उध्दव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. चाळीस आमदारांचा निर्णय अजुन लागलेला नाही. न्यायलयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला. अध्यक्ष आपला निर्णय द्यायला किती दिवस लावतात, कोणाच्या बाजुने निर्णय देतात याकडे राज्याचं लक्ष लागून आहे.
वावड्या उठल्या,अन..!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणार आहे? अजित पवार भाजपासोबत जावून राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात जोरदार झाली होती. आठ दिवस या चर्चेचं गुर्हाळ सुरु होतं. राज्यात काही ठिकाणी अजित पवारांच्या समर्थकांनी बॅनर सुध्दा लावले होते. राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झाली की, काय असं वाटत असतांनाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकारणातुन निवृत्तीची घोषणा केली होती. पक्षाच्या पदाचा राजनीमा देणार असं घोषीत केलं होतं. पवारांच्या वक्तव्याने राज्याच्याच नव्हे देशाच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली. पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणुन कार्यकर्त्यासह नेते आडून बसले होते. शेवटी पवारांनी आपला निर्णय मागे घेतला. पवारांनी अचानकपणे निवृत्तीची घोषणा का केली हे अजुनही लोकांना कळले नाही. अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा बाजुला पडावी म्हणुन तर हा सगळा ‘गेम’ नव्हता ना असं काहींना वाटत आहे. पवार जेव्हा एखादा निर्णय घेतात. तेव्हा त्याचा अंदाज कोणालाच लागत नाही. पवाराचं राजकारण इतरापेक्षा खुपच वेगळं आहे. त्यामुळे पवारांच्या राजकारणाला तोड नाही. पवार पुन्हा राज्यात जोमाने सक्रीय झाले. केंद्रात आणि राज्यात आघाडीची मोट बांधण्याचे काम ते करु लागले.
काँग्रेसचे उतावीळ नेते
काँग्रेसला उभारी मिळवण्यासाठी आणखी बरीच वर्ष घालावी लागतील. काँग्रेसमध्ये काही नेते अर्ध्या हाळकुंडावर पिवळे होणारे असतात. काँग्रेस म्हटलं की, एक शिस्त होती, आज ती शिस्त राहिली नाही. काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाच्या हितापेक्षा स्वत:च्या हिताला जास्त महत्व दिल्यामुळेच आज काँग्रेसचे हे हाल झालेले आहेत. इतकं सगळं होवून ही काँग्रेसचे नेते सुधरायला तयार नाहीत. राज्यात एकेकाळी काँग्रेस एक हाती सत्तेत होती. वीस वर्षात काँग्रेसमधून अनेक नेते फुटून इतर पक्षात गेले. 1999 साली शरद पवार काँग्रेसमधून फुटले आणि त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. पवारामुळे कॉग्रेसचे अतोनात नुकसान झाले. राज्यातील बडे नेते पवार यांच्या पाठीमागे गेले. ज्याचं पवारांशी जमत नव्हतं. असेच नेते काँग्रेसमध्ये राहिले. इतरांनी पवारांचा हात धरला. सध्या काँग्रेस बळकट नाही. काँग्रेसचे नेते पक्षाचं काम कमी आणि वायफळ बडबड जास्त करुन आपलंच हासू करुन घेत आहेत. राज्यात कोण मोठं आणि कोणं छोटं याची जणू स्पर्धाच लागली. नाना पटोले हे नेहमीच काही ना काही वादग्रस्त बोलत असतात. इतर काँग्रेसचे नेते तितके वादात नसतात. पटोले यांना वाद आवडतो की, काय असचं वाटत आहे. दिल्लीत एक असतं. राज्यात काँग्रेसच्या नेत्यात दुसरचं चालत असतं. तीन पक्षाची आघाडी ही तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्याच संगनमताने झाली. राज्यातील तिन्ही पक्षातील नेते यांच्यात तितका समन्वय नसतो हे या तिन्ही पक्षासाठी नुकसानदायक ठरणारं आहे.
ठाकरेंना ताकद दाखवावी लागणार!
भाजपाने शिवसेना संपवून वचपा काढला. आमच्या सोबत नाही तर तुम्हाला कुठलचं ठेवणार नाही अशीच अवस्था त्यांनी ठाकरे यांची केली. भाजपा आणि ठाकरे यांच्यात समेट होईल असं अजिबात वाटत नाही, जे 40 आमदार फुटले. त्या आमदाराचं भविष्यात काय होणार ? जो पर्यंत सत्ता आहे. तो पर्यंत सगळं काही मिळत असतं. एकदा सत्ता गेली की, पुन्हा कुणी विचारत नसतं. सत्ता गेल्यानंतर 40 आमदार पुन्हा दिसतील असं वाटत नाही? कारण सध्या बंडखोराविरुध्द लोकांचा रोष आहे. तो अजुन शमलेला नाही. बंडखोर येणार्या निवडणुकीत भाजपासोबतच असणार हे नक्की झालं आहे. भाजपाला शिंदे यांच्या गटाला काही जागा सोडाव्या लागणार. जागा वाटपावरुन दोघांत समेट होईल, पण स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यात समेट होईल का? अनेकांना वाटत असतं. आपल्याला तिकीट मिळावे. तिकीटावरुन नक्कीच दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आमने, सामने आले तर नवल वाटायला नको. ठाकरे यांना विस्कटलेली घडी बसवायची आहे. त्यासाठी पक्षाचे जे काही नेते आहे, ते राज्यात पक्ष वाढवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आखत आहे. महाप्रबोधन यात्रा राज्यात सुरु होती. ही यात्रा सुषमा अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली होती. या यात्रेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले. सभामधील प्रतिसाद आणि प्रत्यक्षात निवडणुकीतील प्रतिसाद यात बराच फरक असतो. निवडणुकीतच ठाकरे यांना आपली ताकद दाखवून द्यावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत राहणे गरजेचे वाटू लागले. इतर ही काही छोटया पक्षांना सोबत घेण्याचे काम ठाकरे करत आहेत. संभाजी ब्रिगेड हा पक्ष ठाकरे यांच्या सोबत आहे. थेंब, थेंब तळे साचे या प्रमाणे पक्षाची वाटचाल त्यांना करावी लागणार आहे. दीड वर्षाने विधानसभेच्या निवडणुका आहेत. ह्या निवडणुका ठाकरे यांच्यासाठी महत्वाच्या ठरणार्या आहेत. आज पक्षवाढीसाठी प्रयत्न केले तरच उद्या पक्षाचा झेंडा उंचावलेला दिसेल!
आत्मविश्वास वाढला!
कर्नाटकची निवडणुक नुकतीच झाली. या निवडणुकीत भाजपाने प्रचंड ताकद लावली होती. या िंठकाणी भाजपा आडवा पडला. खुद्द पंतप्रधान मोदी यांच्या 36 सभा झाल्या होत्या. पंतप्राधनांच्या इतक्या मोंठया सभा एखाद्या राज्यात व्हाव्यात ही नवलाची गोेष्ट आहे. इतकं सगळं करुन ही कर्नाटकच्या जनतेने भाजपाला आस्मान दाखवलं. काँग्रेसने कर्नाटक जिंकून भाजपासमोर आव्हान उभे केले. कर्नाटकचा निकाल काँग्रेसच्या बाजुने लागल्यानंतर राज्यातील महाआघाडीच्या गोटात आंनदाचे भरते आले. तीन्ही पक्ष एकत्रीत राहिले तर या पक्षाला कुणीच हारवू शकत असतं. असं वाटू लागलं. या तिन्ही पक्षात एकत्रीतपणा राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तीन्ही पक्षात मोठं कोणं याची बेरीज, वजाबाकी केली जावू लागली. एकत्रीत राहायचं म्हटलं तर मागं,पुढे व्हावंच लागणार. तिन्ही पक्षांनी ताणुन धरलं तर मग त्यांच्यात आघाडी राहील असं वाटत नाही. एकहाती सत्ता येणं हे अतिअवघड झालेलं आहे. भाजपाचे गत विधानसभेत 105 उमेदवार निवडून आले होते. भाजपा हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता. आज तशी परस्थिती राहिली नाही. राष्ट्रवादीने 54 जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेने 56 चा आकडा पार केला होता. काँग्रेसने 44 जागा जिंकल्या होत्या. तिन्ही पक्षाची विजयाची आकडेवारी कमी, जास्त प्रमाणात होती. राष्ट्रवादी आणि ठाकरे यांच्या जागेत दोनचाच फरक आहे. काँग्रेसचा फरक बराच आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने जागा वाटपाबाबत अति ताणून धरणं हे काही योग्य नाही. आपली ताकद पाहून काँग्रेसने पाय पसरले पाहिजे. काँग्रेसला गत लोकसभेत फक्त एकच जागा मिळाली होती. येणार्या निवडणुकीची तयारी सुरु आहे. सम, समान जागा वाटपाचा आग्रह तिन्ही पक्ष धरत असतील तर हे अवघडच आहे. ज्या जागा जिंकून येण्याची गॅरंटी नाही. त्या जाग्यावर दावा ज्या, त्या पक्षाच्या नेत्यांनी करायला नको. तिन्ही पक्षाचे कर्तेधर्ते हे शरद पवार हे राहणार आहे. पवाराशिवाय आघाडीत पान ही हालू शकत नाही. पवारांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही पक्षांनी निवडणुक लढवली तर या तिन्ही पक्षांची ताकद वाढल्याशिवाय राहणार नाही. उगीच तु, तु,मै, मै करुन फायदा नाही. तिन्ही पैकी मोठा कोण हे येत्या निवडणुकीत दिसून येईल. मोठा होण्यासाठी तिन्ही पक्षाच्या नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. आतापासूनच उगीच त्यावर चर्चा करुन फायदा नाही.