गंभीरतेने घ्या, थातूरमातूर कारवाई नको, पोलिसांचेच
किती टिप्पर?
बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यात वाळू माफियांची डेअरींग इतकी वाढली की त्यांनी थेट जिल्हाधिकार्यांशी दोनहात करण्याचा प्रयत्न केला. ही हिम्मत येते कुठून? आता बस्स थातूरमातूर कारवाई नको, प्रकरण गंभीरतेने घ्या, विना नंबरचे आणि केवळ सिम्बॉल असलेले टिप्पर शोधा, टोल नाक्यावरचे सीसीटीव्ही फुटेज पहा, दुधाचं दूध पाण्याचं पाणी होईल. कोण वाळू माफिये आहेत, त्यांच्या गाड्या किती चालतात, त्यामध्ये पोलिसांच्या किती आहेत, एलसीबीमधील कर्मचार्यांच्या किती आहेत याची इत्यंभूत माहिती बीड जिल्हा पोलीस प्रशासनाला आहे. तहसीलदारांपासून तलाठ्यांपर्यंत प्रत्येकाला आहे. मात्र हप्त्याची अफू खावून बसलेले लाचखोर वाळू माफियांना अभय देतात, त्यामुळेच सर्वसामान्यांना गाडीखाली चिरडणारे वाळू माफिये आता थेट कलेक्टरांच्या गाडीला लक्ष्य करत आहेत.
परवा जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्या सोबत घडलेली घटना ही अत्यंत संतापजनक महिला असताना ज्या पद्धतीने दीपा मुंडे या बीड जिल्ह्यात काम करत आहेत ते कौतुकास्पद आहे, मध्यरात्रीच्या दरम्यान वाळू माफियांशी दोनहात करणार्या जिल्हाधिकार्यांच्या जिवावर बेतणारी ती घटना म्हणून आता बास्स झालं, वाळू माफियांचे चोचले पुरवणे बंद करा, बीडचे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन या घटनेला जबाबदार आहेत. हप्ते खावून सर्रासपणे वाळू माफियांना मुभा देणे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, त्यामुळेच
ते निर्ढावले, आतापर्यंत सर्वसाामन्यांना गाडीखाली चिरडत होते, आता थेट कलेक्टरांच्या गाडीसोबत भिडत आहेत. एकाही वाळूच्या गाडीला जीपीएस नाही, नंबर प्लेट नसते, ज्या गाड्यांना नंबर प्लेट आहे त्याच्यावर चिखल अथवा शेण फासलं जातं, परंतु बीड जिल्ह्यात कुठून कुठे वाळू जाते? कोण वाळू माफिया आहेत? त्णयघांच्याकडे किती टिपपर, किती ट्रॅक्टर आहेत, याची माहिती पोलीस यंत्रणेपासून महसूलच्या तहसीलदार ते तलाठ्यापर्यंत सर्वांना आहे. आता शोध घ्यायचा असेल तर टोलनाक्यावर सीसीटीव्ही फुटेज तपासले तर प्रत्येक गाडी दिसून येईल, सापडेल. जिल्हाधिकारी यांना आव्हान दिल्यामुळे पोलीस यंत्रणेने रात्रीचा दिवस करून ते टिप्पर सापडवलं, मात्र आतापर्यंत कित्येकांचे जीव वाळुच्या टिप्परखाली, ट्रॅक्टरखाली गेले. नदी पात्रात खड्डे पडल्याने त्या पाण्यात बुडून अनेक लेकरे मृत्युमुखी पडले. आता थेट जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी या प्रकरणाकडे गंभीरतेने घ्यावं. महसूल व पोलीस विभागातील लाचखोर कर्मचार्यांना सापडावं, अनेक टिप्पर हे पोलीस कर्मचार्यांचे आहेत. हे जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांना माहित नसेल तर त्यांनी ते माहिती करून घ्यावं, तुमच्या गुन्हे अन्वेषण विभागातल्या किती कर्मचार्यांच्या गाड्या चालतात हेही तपासावं, आता यांचे लाड थांबवा, थेट कलेक्टरांच्या माथ्यावर हे वाळू माफिये मिरे वाटू लागले आहेत.
एसपी नंदकुमार ठाकूर पंधरा दिवसांपूर्वीच्या नगर नाक्यावरच्या घटनेचा आढावा घ्या
बीड शहरातल्या नगरनाक्यावर पंधरा ते वीस दिवसांपूर्वी बाजार समितीच्या इलेक्शन ड्युटीसाठी एक पोलीस कर्मचारी मोटारसायकलवर निघाला, भरधाव येणार्या वाळूच्या टिप्परने त्याला अक्षरश: चिरडले. तो गंभीररित्या जखमी झाला. अपघात घडला तेव्हा वाहतूक पोलीस घटनास्थळावर होती, पोलिसांनी टिप्पर ताब्यात घेण्याऐवजी ते घटनास्थळावरून पसार केलं, जखमी पोलिसाला रुग्णालयात दाखल केलं, या प्रकरणाची कुठेही दाद ना फिर्याद, मग हे प्रकरण कुणी मिटवलं, का मिटवलं, ते टिप्पर कोणाचं होतं? वाहतूक पोलिसांचे वाळू माफियांवर प्रेम उतू का गेलं? या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच शोध आणि तुम्हाला प्रश्न पडले तर डोळे मिटून बसा.