बीड (रिपोर्टर) बीड शहरात गेल्या काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे एका एका भागास 20 ते 25 दिवसाला पाणीपुरवठा होत असल्याने सर्वसामान्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे तर दुसरीकडे वीज कंपनीकडून शहरातल्या वीजपुरवठ्यात सातत्याने खंड पडत असल्याने सर्वसामान्यांसह व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. पाणी आणि वीज ही अत्यावश्यक सेवा देण्यात प्रशासनातले लोक कमी पडत असले तरी हारतुरे घेणारे आणि कुठलेही काम आम्हीच केले म्हणणारे लोकप्रतिनिधी आता झोपलेत का? असा जळजळीत सवाल सर्वसामान्यांकडून व्यक्त केला जात आहे. बीड शहरातल्या वीज पुरवठ्याबाबत आणि पाणी प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधींसह वेगवेगळ्या संघटनेच्या नेत्यांनी आवाज उठवावा, अशी मागणी होत आहे.
राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार आल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठप्प आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक आहेत. प्रशासक हे संबंधित संस्था चालवण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत असून बीड नगरपालिकेच्या अंधाधूंद कारभारामुळे पाणी असताना बीडकरांना तहानलेले रहावे लागत आहे. बीड शहरातल्या अनेक भागात वीस ते पंचेवीस दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते अथवा पाणी विकत घ्यावे लागते. नगरपालिकेचा जसा भोंगळ कारभार आहे तसाच बीड शहरात वीज कंपनीच्या अधिकार्यांचा मनमानीपणा गेल्या महिनाभरात दिसून येऊ लागलाय. एकीकडे उन्हाचे टेम्परेचर आणि उकाड्याने सर्वसामान्य त्रस्त असताना वीज कंपनीकडून पुरवली जाणारी वीज सातत्याने खंडीत होत आहे. आज पाणी आणि वीज सर्वसामान्यांसाठी अत्यावश्यक असताना या दोन्ही गोष्टी बीडकरांना वेळेवर मिळत नाहीत. असे असले तरी बीडच्या लोकप्रतिनिधींना या गंभीर प्रश्नाबाबत कुठलेच देणेघेणे नसल्याचे दिसून येते. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवणे आणि नोकरदारांनी केलेला कामचुकारपणा सुधरवणे हे लोकप्रतिनिधींबरोबर नेतृत्वाचे काम असते. या गंभीर प्रश्नाकडे मात्र बीडचे लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांचे नेते दुर्लक्ष करत आहेत. त्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी सर्वसामान्यातून होत आहे.