बीड (रिपोर्टर):- शहरातल्या तुळजाई चौकात सोंडगे यांच्या बिल्डींगमध्ये पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास पोलीस गणवेशात एका व्यक्तीने तिसर्या मजल्यावर राहणारे आंधळे यांचे दार ठोठावले. इथे कोण राहते? तुम्ही काय करता? इथे मुले राहतात का? आमचा माणूस तुमच्या रुममध्ये अॅडजेस्ट होईल का? असे प्रश्न विचारल्याने काही काळ संबंधित परिवार पोलीस गणवेशातल्या व्यक्तीमुळे त्रस्त झाले. याबाबत आंधळे यांनी आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन त्याबाबत चौकशी केली असता पोलिसांनी नेहमीसारखे थातूरमातूर उत्तर दिले मात्र गणवेशात आलेला तो व्यक्ती पोलीस होता की चोर ? हा प्रश्न कायम राहिला.
याबाबत अधिक असे की, बीड शहरातल्या तुळजाई चौकात सोंडगे यांची बिल्डींग आहे तिसर्या मजल्यावर नानाभाऊ आंधळे हे राहतात. आज पहाटे 3.45 च्या दरम्यान त्यांचा दरवाजा वाजला.
त्यामुळे त्यांनी दरवाजा उघडला असता पोलीस गणवेशात एक व्यक्ती दिसून आला. सदरच्या व्यक्तीने तुम्ही काय करतात, तुमचे नाव काय, इथे मुले राहतात का, असे एक ना अनेक प्रश्न विचारले. गणवेशात व्यक्ती असल्यामुळे आंधळे यांनी उत्तर तर दिलेच संबंधित व्यक्तीला तुम्ही या वेळी कसे आलात? असा प्रश्न विचारला. त्यावेळी त्या व्यक्तीने मी राऊंडला आहे, असे म्हटले त्यावेळी आंधळे यांचा मेहुणाही दारात आला, घरामध्ये दोन पुरुष असल्याचे पाहून पोलीस गणवेशात असलेला तो व्यक्ती तीन मजले खाली उतरून निघून गेला. आंधळे यांनी गॅलरीवरून पाहिले असता तो स्कुटीवरून निघून गेल्याचे सांगण्यात आले. आज सकाळी आंधळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन चौकशी केली मात्र तो व्यक्ती कोण होता, पोलीस होता की चोर?याचा शोध आता शिवाजीनगर पोलिसांनी लावावा.