गणेश सावंत
मो. नं. 9422742810
रात्र वैर्याची नव्हे, तर रात्रंदिवस हा कुरापतखोरांचा आहे. कोण-कुठे-केव्हा कुठल्या विषयातून विष कालवेल हे सांगणे कठीण होऊन बसले आहे. जात-पात-धर्म-पंथाच्या नावावर कुरापतखोरांचा धंदा तेजीत आहे. स्वार्थाच्या पोळ्या भाजून हे कुरापतखोर आपल्या आखाला खुश करत आहेत. मात्र यांच्या कुरापतखोरीमुळे राज्याच्या आणि देशाच्या गल्ली-बोळांमध्ये जो असंतोष पसरत आहे आणि जो तो रोजच्या मित्रात धार्मिक दुश्मन पहात आहे ते गावाला, राज्याला आणि देशाला नक्कीच परवडणारे नाही. अशा कुरापतखोरांचा धंदा मंदा करण्याहेतू आपले मस्तक स्वच्छ आणि बौद्धीक खुराकातून मजबूत करत आजच्या पिढीने कुरापतखोरांच्या डोक्यातल्या धर्मांधतेच्या अळ्या ठेचल्या पाहिजेत. दुर्दैव याचं वाटतं, माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात आम्ही धार्मिक द्वेषात अडकलो. याचा फायदा कुरापतखोरांबरोबर पैशाचे आणि सत्तेचे माफिये उचलतात. त्यांच्या स्वार्थाच्या भांडणांना मात्र सर्वसामान्यांच्या पैशावर चाललेल्या लोकशाहीतील प्रशासनाचा पहारा द्यावा लागतो. लोकांच्या मुलभूत प्रश्नांकडे ज्या प्रशासनाचे लक्ष केंद्रित असायला हवे, शासन व्यवस्थेने मुलभूत प्रश्नांचे उत्तर शोधायला हवे, ते शासन-प्रशासन व्यवस्थेकडून होताना दिसून येत नाही. महाराष्ट्रासारख्या संस्कार आणि संस्कृतीच्या माहेरघरात जात-पात-धर्माचा पगडा अधिक पहायला मिळत असल्याने
‘चील उडी तो भैस उडी’
सारखे प्रकार महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात घडताना दिसून येत आहेत. दोन लहानग्या मुलात वाद झाले, खेळता-खेळता एकमेकांनी साधे एकमेकांचे गचुरे पकडले, त्यात ते दोघे हिंदू-मुसलमान असावेत, मग त्या बोबड्या भांडणाचा जो इश्यू एचएमच्या नावाने केला जातो, घटनास्थळावर जमाव जमतो आणि त्या जमावातून बोट लावलं की, पोट आल्यागत अफवांचा जो पेव फुटतो आणि त्या अफवांच्या पेवात धार्मिक द्वेषाच्या वाफा निघतात त्या अवघ्या शहराला अस्वस्थ करून सोडतात. बीड शहरात गेल्या महिन्या-दोन महिन्यांच्या कालखंडामध्ये अशा चिटूरफुटूर घटना घडल्या आणि त्यानंतर घटनास्थळावर हिंदू असो वा मुसलमान या दोघांनी मोठा जमाव केला आणि या जमावातून जणू मोगल आणि स्वराज्य सैनिक आमने-सामने उभे आहेत, असा देखावा चर्चेतून निर्माण होत गेला. तो संतापजनक म्हणावा लागेल. आज मितीला समाजामध्ये एकीचे बळ असणे आणि दाखवणे नितांत गरजेचे आहे. जग भौतिक विकास करू पहात असताना आपण भौतिक सुखाच्या फेकलेल्या तुकड्यावर जो काही धर्मांधतेचा पेव नाचवतो तो आजच्या आणि येणार्या पिढीला नेस्तनाबूत करणारा आहे. हे लक्षात घ्यायला हवे. खरे पाहिले तर शिक्षण क्षेत्रामध्ये आपला पाल्य कसा पुढारलेला असेल, याकडे लक्ष देण्यापेक्षा धार्मिक द्वेषाच्या बिजाची पेरणी करू पाहणार्या पाल्यांकडे पालकांचे दुर्लक्ष होते, त्यातून ‘चील उडी तो भैस उडी’ची परिस्थिती निर्माण होते. आज
दृष्टीकोन
शिकवणे नितांत गरजेचं आहे. कोणी काटकोन शिकवतो, त्रिकोण शिकवतो, चौकोन शिकवतो, षटकोन शिकवतो मात्र आयुष्याच्या या जिवन प्रणालीत भविष्यासाठी दृष्टीकोन कोणी शिकवतोय का? आपल्या पाल्यांना शिक्षणाबरोबर आर्थिक, सामाजिक, व्यवहारीक ज्ञान तेवढेच गरजेचे आहे जेवढे जात-पात-धर्म-पंथाच्या विषवल्लीला उपटून टाकेल, त्या पाल्याकडे अथवा त्या तरुणाकडे सामाजिक, आर्थिक, व्यवहारीक ज्ञान आणि दृष्टीकोन असेल तर त्याच्या मस्तकामध्ये धार्मिक द्वेषाच्या शिकवणीला जागा पुरणार नाही. परंतु स्पर्धेच्या युगामध्ये आपलं पोरगं एकतर मोठं व्हावं यासाठी जे शिक्षण दिलं जातं त्या शिक्षणामध्ये दृष्टीकोन हा विषय ठेवलाच जात नाही. जिथं मुलांना दृष्टीकोनच शिकवण्याची मानसिकता आजच्या पालकात नाही, म्हणजेच दृष्टीकोनाचं महत्व आजच्णयघा पालकांना नाही म्हणून दृष्टीकोन विरहीत लेकरे अशा कुरापतबाजांच्या काव्यात येतात आणि त्यातून सामाजिक द्वेष निर्माण करू पाहणार्यांचे हे चेले होतात. हे इथेच थांबलं पाहिजे. शासन-प्रशासन व्यवस्थेबरोबर सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसाची ती जबाबदारी आहे. धार्मिक द्वेषाच्या बदफैलीचा फैलाव होणार नाही, आम्हाला दुर्दैव याचं वाटतं, पंढरीच्या वारीत
जातीय द्वेषाची पेरणी
करण्याचा प्रयास आता काहींनी चालवलाय. सावळा विठ्ठल आणि त्याचे अठरापगड जातीचे भक्त वारकरी आता याच माऊली म्हणणार्या स्त्री-पुरुष, अबाल-वृद्धांच्या लहान-थोरांच्या पायाला हात लावणार्या या वारकर्यांच्या वारीला धर्मांधतेची झालर लावण्याचा प्रयासही दिसून येतं. काल-परवा एक मुस्लिम वारीमध्ये ‘अल्लाह-देव अल्लाह दिलावे, अल्लाह दारू अल्लाह खिलावे, अल्लाह बिगर न कोई, अल्लाह करे सोयी होय’ अशा आशयाच्या काव्यातून प्रवचन करताना दिसून आला. धर्मांधतेच्या विषवल्लीत कफल्लीत झालेल्या काहींनी यावर प्रचंड आक्षेप घेत आता मुस्लिम वारीत घुसखोरी करत आहेत, फक्त अल्लाह एकच देव आहे, हे सांगण्यासाठी आणि वारकर्यांना भुलवण्यासाठी मुस्लिमांचा हा प्रयोग आहे, असे म्हणतात तेव्हा अशा जात्यांद्यांची किव आल्याशिवाय राहत नाही, अल्लाह देव अल्लाह दिलावे हा जगद्गुरू संत तुकारामांचा अभंग आहे. त्यातून ते समाजप्रबोधन करताना दिसून आलेले आहेत. मात्र ज्यांना तुकोबा माहित नाहीत, ज्यांना नामदेव, संत तुकाराम माहित नाहीत, असे लोक जेव्हा यावर भाष्य करतात अणि त्या भाष्यावर आजच्या तरुण पिढीचे माथे भडकतात तेव्हा आजच्या पिढीला दृष्टीकोन शिकवणे किती महत्वाचे आहे हे दिसून येते. आजच्या समाजात आणि आपला पाल्य भविष्यात चांगला माणूस घडो, हे स्वप्न पाहणार्या तमाम पालकाचां
रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग
असा दिवस होऊन बसला आहे. जिथं दृष्टीकोन नाही, तिथे बौद्धीक विकासाचा प्रश्नच नाही. त्या मस्तकामध्ये दृष्टीकोन नसल्याने रिकामी जागा आहे आणि ती रिकामी जागा भरण्याहेतू जात्यांधांची पिलावळे जिथे तिथे पहावयाला मिळत आहेत. खरं पाहिलं तर धार्मिक द्वेष पसरला जाणार नाही आणि पसरवला जाणार नाही याची जबाबदारी हिंदू आणि मुसलमानांनी स्वीकारली तर कुरापतबाजांचे दुकान केव्हाच बंद होईल. सीतावरून भाताची परीक्षा केली जाते. म्हणून आम्ही आज गेल्या दोन महिन्यात बीड शहरामध्ये ज्या घटना घडल्या आणि किरकोळ कारणावरून जो मोठा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली ती दृष्टीकोन नसलेल्या व्यक्तींमुळे आता तोच दृष्टीकोन प्रत्येकाच्या डोक्यात असायला हवा आणि हा दृष्टीकोन सकारात्मक, निधर्मवादी, एकमेका सहाय्य करू, असा असेल तर तो अधिक चांगला. समाजाच्या आरोग्याला दृृढता निर्माण करणारा, सर्व जात-पात-धर्म-पंथातील पाल्यांच्या फिजिकलसह मानसिक दृढतेला विश्वासर्हतेने बळ देणारा ठरेल. तो दृष्टीकोन हवा. ÷