बीड (रिपोर्टर): दमदार पाऊस पडत नसल्याने खरीपाच्णया पेरण्या खोळंबून पडल्या होत्या. शेतकरी दररोज पावसाची आतुरतेने वाट पहात होते. रात्री बीड तालुक्यातील अनेक सर्कलमध्ये मुसळधार पाऊस पडला. जवळपास एक ते दीड तास पाऊस सुरू होता. या पावसामुळे त्या त्या नद्या-नाल्यांना चांगले पाणी आले होते. रात्रीच्या पावसाने बीड तालुक्यातील शेतकर्यात समाधान व्यक्त होत आहे. आता त्या परिसरात पेरण्याची लगबग सुरू होणार आहे.
जून महिना पुर्णत: कोरडा गेला. त्यामुळे शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. जिल्ह्यात फक्त एक टक्काच पेरणी झाली होती. दमदार पावसाची वाट शेतकरी पहात होते. रात्री बीड तालुक्यातील अनेक सर्कलमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. पावणे नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत मुसळधार पूस पडल्याने या पावसाने बीड तालुक्यातील शेतकर्यात समाधान व्यक्त केले जात असून रखडलेल्या पेरण्यांना आता वेग येणार आहे. रात्रीच्या पावसाने नद्या-नाल्यांना चांगले पाणी आले होते. दरम्यान अनेक शेतकर्यांनी बी-बियाणे खरेदी करून ठेवले होते, मात्र पेरणीयोग्य पाऊस पडत नसल्याने शेतकर्यांनी लागवड केलेली नव्हती. आता मात्र वापसा झाल्यानंतर बीड तालुक्यात लागवडीला वेग येणार आहे.
पहिल्याच पावसाने बीड शहर तुंबले
बीड : बीड शहरात मान्सूनपुर्व स्वच्छता झाली नसल्याने रात्री झालेल्या पावसाने बीड नगरपालिका प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणला. अनेक भागात नाल्या तुंबल्याने लोकांच्या घरात पाणी शिरले. सर्व घाण रस्त्यावर आली. नगरपालिकेला त्यानंतर सकाळी जाग आली असून आता तुंबलेल्या नाल्या साफ करणे सुरू आहे.