मुंबई (रिपोर्टर): राष्ट्रवादी कुणाची? हे उभ्या महाराष्ट्राला दाखवण्यासाठी काका-पुतण्यांनी मुंबईत बैठका लावल्या. शरद पवार यांच्या वायबी सेंटर येथील बैठकीला 17 आमदारांनी उपस्थिती दर्शविली तर अजित पवारांच्या एमटी इन्स्टिट्यूट येथील बैठकीला तब्बल 32 आमदारांनी उपस्थिती दर्शवल्याने अजित दादांकडे दुप्पट आमदारांची संख्या दिसून आली. दोन्ही सभागृहे कार्यकर्त्यांनी तुडुंब भरलेले पहावयास मिळाले. अजित पवारांसह उपस्थित मंत्री-आमदारांचा फलोहार देऊन सत्कार करण्यात आला तर इकडे शरद पवारांच्या व्यासपीठावर गर्जा महाराष्ट्राचा निनाद ऐकावयास मिळाला.
2014 ला भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या, तेव्हा राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा दिला. नेत्यांचा निर्णय म्हणून आम्ही गप्प बसलो. आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियमवर गेलो, वरिष्ठांनी सांगितलं म्हणूनच गेलो, भाजपा सोबत जायचं नव्हतं तर आम्हाला शपथविधीला का पाठवलं? 2017 मध्ये भाजपासोबत जाण्याचा प्रयत्न झाला, 2019 मध्ये भाजपासोबत पाच बैठका झाल्या, सातत्याने भूमिका बदलायची, असं म्हणत अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला. मी हे खोटं सांगत नाही, मी कधी खोटं बोलत नाही, खोटं बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे स्पष्ट बालून आजपर्यंतच्या पडद्याआडच्या गोष्टी अजित पवारांनी जनतेसमोर मांडल्या.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले, ही वेळ आपल्यावर का आली? शरद पवारांच्या छत्रछायेखाली, मार्गदर्शनाखालीच मी तयार झालो आहे. शरद पवार आपले श्रद्धास्थान आहे, याबाबतही ही तीळमात्र शंका घेण्याचे कारण नाही. 1978ला शरद पवारांनी वसंतदादांविरोधात बंड करून पुलोदचे सरकार स्थापन केले. तेव्हापासून शरद पवारांना महाराष्ट्राने साथ दिली.
अजित पवार म्हणाले, आपल्या देशाला कुणी ना कुणी करिष्मा असणारा नेता लागतो. इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण या सर्वांना देशाने साथ दिली. त्यानंतर अनेक स्थित्यंतरे झाली. आम्ही तरुण होतो तेव्हा नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांसाठी काही तरी करुन दाखवण्याची आमची महत्त्वकांक्षा होती. 1999 मध्ये राज्यात राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आले तेव्हा माझ्याकडे फक्त 7 जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली. तरीही मी काही तक्रार केली नाही. नंतर 2004ला राष्ट्रवादीचे 71 आमदार आले. काँग्रेसचे 69 आमदार आले. तेव्हा सोनिया गांधींनी विलासराव देशमुखांना सांगितले होते की, राष्ट्रवादीच्या जागा अधिक असल्याने मुख्यमंत्री त्यांचा होईल. मात्र, 4 मंत्री अधिक घेऊन आलेली संधी राष्ट्रवादीने घालवली. ती संधी मिळवली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसला असता. त्यानंतर 2022 मध्ये आलेली मुख्यमंत्रीपदाची संधीही राष्ट्रवादीने घालवली.
अजित पवार म्हणाले, मी कधीही आमदारांसोबत भेदभाव केला नाही. कामाच्या बाबतीत मी कधीही पक्षपात केला नाही. विकास हेच आमचे ध्येय आहे. आम्ही काल घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही अनेक चांगले निर्णय घेतले. सत्तेत जाऊन लोकांचे प्रश्न सोडवता येत असेल तर तसे का करायचे का नाही.
अजित पवार म्हणाले, 2014ला भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. तेव्हा राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. नेत्यांचा निर्णय म्हणून आम्ही गप्प बसलो. आम्हाला देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियमवर जायला सांगितले. आम्ही गेलो. मात्र, आमच्या नेत्यांना तेव्हा भाजपबरोबर जायचेच नव्हते तर आम्हाला शपथविधीसाठी का पाठवले? त्यानंतर 2017ला पुन्हा वर्षा बंगल्यावर बैठक झाली. आमच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्यासह चार नेते होते. कुठली खाते, पालकमंत्रीपद कोणाला द्यायचे, याची चर्चा केली. मी हे खोटे सांगत नाही. मी कधीही खोटे बोलत नाही. खोटे बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही. त्यानंतर आम्हाला दिल्लीला बोलावले. दिल्लीतील नेत्यांनी सांगितले, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप असे सरकार राहिल. आमच्या नेत्यांना हे पटले नाही. शिवसेनेवर तेव्हा आमच्या नेत्यांनी जातीयवादाचा आरोप केला.
अजित पवार म्हणाले, 2019मध्ये निकालानंतर मोठ्या उद्योगपतींच्या घरी आपले वरिष्ठ व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यात फडणवीस व मी हजर होतो. आम्हाला सांगितले याबाबत कुठेही बोलायचे नाही. त्यामुळे मी बोललो नाही. त्यानंतरचा घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे. हे सर्व चालू असताना अचानक शिवसेनेसोबत जाण्याचे ठरले. 2017ला शिवसेनेला जातीयवादी म्हणून आमचे नेते आरोप करत होते. मात्र, अचानक असा काय चमत्कार झाला की, आम्ही 2019ला शिवसेनेसोबत सरकार स्थापन केले. भाजपसोबत 5 बैठका झाल्या, पण ऐनवेळी शिवसेनेसोबत जाण्यास सांगितले. तेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले. तरीही मी काही बोललो नाही.
अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच शिवसेनेतील अवस्थतेबाबत आम्हाला कुणकुण लागली होती. आम्ही उद्धव ठाकरेंना याकडे लक्ष द्या, असेही सांगितले होते. पण जे व्हायच ते झालच. त्यानंतर आमचे सरकार गेले. त्यानंतर आम्ही सर्व आमदारांनी सह्या करून साहेबांकडे विनंती केली की, आपण सरकारमध्ये जाऊया. आपल्या आमदारांची कामे होत नाहीत. निवडणुकीत आपण लोकांसमोर काय सांगायचे. तेव्हाच एकनाथ शिंदेंचे बंड सुरू होते. तेव्हा एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला नव्हता. मात्र, तेव्हा पुढे जाण्यास आम्हाला रोखले.
अजित पवार होणार मुख्यमंत्री
मुंबई अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचा ठाम दावा एका इंग्रजी न्यूज पोर्टलने केला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र घोषित ठरतील. त्यानतंर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे निर्देश देतील. यामुळे आपसूकच राज्य मंत्रिमंडळ बरखास्त होईल, असे या पोर्टलने सूत्रांचा दाखला देत म्हटले आहे.11 ऑगष्ट रोजी अजित पवार हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील त्या पूर्वी शिंदेसेनेचे 16 आमदार निलंबित करण्यात येईल त्यात एकनाथ शिंदे हि असतील . राज्यात पुन्हा एक मोठा भूकंपाची शक्यता असल्याने शिंदे सेनेत खळबळ उडाली आहे
अजित पवार संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर येत्या 11 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आशीर्वादाने दिल्लीत हा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे, असे रेडिफने आपल्या वृत्तात म्हटले आहे. रेडिफच्या या दाव्यामुळे अगोदरच अस्वस्थता पसरलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे. एवढेच नाही तर राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ माजली आहे.
एकनाथ शिंदे यांनी 20 जून 2022 रोजी उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. तत्पूर्वी, अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्याशी नियमित संपर्कात होते. पण भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्री
करण्याची मागणी फेटाळल्यामुळे शेवटच्या क्षणी ही योजना फसली, असा दावा या न्यूज पोर्टलने आपल्या वृत्तात केला आहे.अजित पवार मार्च 2022 पासून अमित शहांच्या नियमित संपर्कात होते. शिंदेंच्या बंडखोरीपूर्वीच अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी मान्य केली असती, तर त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले असते, असेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
पृथ्वीराज चव्हाणांचे भाकित खरे ठरणार?
काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परवाच शिंदे यांच्या जागी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचा सौदा झाल्याचा दावा केला होता. अजित पवार भाजपसोबत जाणार हे मी अगोदरच जाहीरपणे सांगितले होते, पण मला टीकेला सामोरे जावे लागले. या प्रकरणी केवळ अजितदादांना काय मिळणार याची बार्गेनिंग सुरू होती. माझ्या माहितीनुसार, सभापतींच्या निर्णयाच्या मदतीने (म्हणजे एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र ठरवून) शिंदेंची मुख्यमंत्रीपदावरून (शिंदे) हकालपट्टी केली जाईल. त्यानंतर अजित पवारांना मुख्यमत्री केले जाईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे, असे चव्हाण म्हणाले होते.
हात जोडून विनंती करतो
व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येकाने साहेबांसाठी काम केले. त्यांच्यासाठी जीव ओतला, आज माझं मन रडतय, आजपर्यंत दादांनी किती वेदना झेलल्या, किती अपमान सहन केले, हे त्यांचे त्यांना माहित आहे. आपल्या छातीवर हात ठेवा, मला सांगा, या व्यासपीठावर बसलेला एकही नेता साहेबांचा शब्द ओलांडू शकतो का? असा सवाल करत मंत्री धनंजय मुंडे यांनी हात जोडतो, हात जोडून विनंती करतो, लोकशाहीला मानणारे साहेब, आपल्या या लोकशाहीलाही मानतील, असं म्हणत 12 कोटी महाराष्ट्रवासियांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले.
मोठ्या साहेबांच्या हाताला धरून अजितदादा राजकारणात आले. त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. मात्र पदोपदी त्यांना अपमान मिळाला. मन:स्ताप मिळाला. सर्वात जास्त अपमान, मानहानी अजितदादांनी भोगली. माझा नियतीवर प्रचंड विश्वास आहे. नियत स्वच्छ असेल तर ती आपल्या पाठिशी असते. माझ्यावरही ही वेळ आली होती, तेव्हा लोक तोंडावर थुंकले मात्र आज लोक पाठिशी आहेत. स्वाभिमान जीवंत ठेवण्यासाठी अजितदादांनी हा निर्णय घेतला. काही लोक म्हणतात, तुम्हाला हिंदुत्व मान्य आहे का? होय आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य मान्य आहे आणि त्या स्वराज्यातला कारभारच अजितदादा करणार आहेत. एखाद्या गुरुजींनी जे कर्तृत्व केलं ते कर्तृत्व विद्यार्थ्याने केलं तर तो मान आहे की, अपमान? असा सवालही धनंजय मुंडेंनी उपस्थितांसमोर केला. पहा या ठिकाणी राष्ट्रवादी आहे, हात जोडून विनंती करतो, लोकशाहीला मानणारे साहेब आपल्याही लोकशाहीला मानतील. असे धनंजय मुंडेंनी म्हटले.
शरद पवार आमचे विठ्ठल
यावेळी छगन भुजबळ यांनी शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत असं म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे छगन भुजबळ यांनी?मी तुरुंगातून बाहेर आलो तेव्हा अनेकांनी आमिषं दाखवली. पण आम्ही गेलो नाही. शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलो आणि काम केलं. पण आता काय हा प्रश्न आहेच. साहेबांना (शरद पवार) वाईट वाटणं स्वाभाविक आहे. दिलीप वळसे पाटील यांच्यापासून सगळी मंडळी गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी तरळणं स्वाभाविक आहे. असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.