गेवराई (रिपोर्टर) तालुक्यातील भूमीहीन, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक आणि वंचित समूहातील शेतमजुरांच्या ताब्यातील गायरान जमिनी निवासी अतिक्रमणे कायम करून त्यांना मालकी हक्क देण्यात यावा या प्रमुख मागणीसह इतर न्याय मागण्याच्या संदर्भाने गेवराई तहसील कार्यालयावर सोमवार दि.10 रोजी संविधान अधिकार मोर्चा काढण्यात आला होता. आज दुपारी
निघालेल्या या संविधान मोर्चात भूमीही कुटुंबाला कोरडवाहू 5 एकर किंवा बागायती अडीच एकर जमीन कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत मिळालीच पाहिजे, भूमिहीन शेतमजूर, मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्यांक, आदिवासींच्या ताब्यातील गायरान जमीन कास्तकारांच्या विनाअट नावे करून त्यांना मालकी हक्क देण्यात यावा, दलित, आदिवासी वरील वाढत्या अत्याचाराला पायबंद घालून महाराष्ट्र शासनाने आरोपीस कठोर शासन करण्याची तरतूद करावी आणि सामूहिक अत्याचार प्रकरणातील संबंधित गावाचा विकास निधी ताबडतोबिने बंद करण्यात यावा,
भीम नगर गेवराई येथील दलित समाजाच्या मालकी हक्कातील (पीटीआर) असलेल्या घरांना अतिक्रमणे निष्कषित करा म्हणून नोटीसा देणाऱ्या संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती जमातीच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, शासकीय सेवेतील कंत्राटी पद्धत बंद करून शासकीय सेवेतील रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात, गेवराई शहरातील सर्व अतिक्रमणधारकांना मालकी हक्काचे उतारे (PTR) देण्यात यावेत, गेवराई शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास शिवाजी चौकात आणि पंचायत समिती कॉर्नर, आंबेडकर चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी आवश्यक त्या गरजेनुसार जागेची तरतूद करण्यात यावी, उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे कायमस्वरूपी तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी. यासह अनेक प्रमुख मागण्यांचा समावेश होता. यामध्ये मोठ्या संख्येने भूमिहीन, दलित, आदिवासी यांच्यासह अल्पसंख्यांक बांधवांची उपस्थिती होती.