#शरद पवारांना हारवणं सोप नाही?
शिवसेने नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. राष्ट्रवादी पवारांची आहे, हा पक्ष फुटणार नाही. असं काहींचं भाकीत होतं, त्याचं भाकीत खोटं ठरलं. अजित पवार पक्षात नाराज होते, नाराजीमुळे ते पक्ष सोडतील असं वाटत होतं. अजित पवार पक्षाचं अशा पध्दतीने नुकसान करतील याचा अंदाज नव्हता. राजकारणात महत्वकांक्षा वाढली. कुणालाही सहज महत्वाची पदे मिळावीत असं वाटतात. राजकारण हा गलिच्छ प्रकार झाला. हमाम मे सब….! अशी अवस्था आजचे राजकारण पाहितल्यावर म्हणावे वाटते. अजित पवार 32 आमदार सोबत घेवून गेले. तसा त्यांनी दावा केला, बैठकीत सर्व बंडखोर त्यांच्या सोबत होते. अजित पवारांनी बंड केल्यानंतर आपली भुमिका मांडली. शरद पवार यांच्या सन 1978 च्या बंडापासून ते अलिकडच्या म्हणजे 2004 पर्यंतच्या राजकीय परस्थिती बाबत त्यांनी भष्य केले. पवार कसे, कुठे चुकत आले याची मांडणी करायला ते विसरले नाहीत. त्यांचे वय झाले, त्यांनी आता थांबायला हवे होते, दुसर्यांना संधी द्यायला हवी. अशी ही त्यांची प्रमुख तक्रार होती. अजित पवार हे मोठे झाले ते, शरद पवार यांच्यामुळेच, याचा त्यांना कदाचीत विसर पडला वाटतं, नाही तर अजित पवारांना कुणी ओळखले नसते? कोणाला कुठं आणि कधी संधी द्यायची हे नेत्याच्या हातात असतं. राष्ट्रवादी पक्षाचे जवळपास सगळेच कामे अजित पवार पाहत होते. पवारांच्या मनात आलं असतं तर अजित पवारांना त्यांनी पुर्वीपासून जरा दुरच ठेवले असते. अजित पवार यांना आज पर्यंत चार वेळा उपमुख्यमंत्री होता आलं ते पवारामुळेच. अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे आहेत. त्यामुळे इतर राजकारणी त्यांना थरकून होते. अजित पवार हे शरद पवारांचे कुणीच नसते तर ते इतक्या मोठया उंचीवर गेले ही नसते.
#खा. सुप्रिया यांना मुख्यमंत्री करता आले असते?
राज्यातील आणि देशातील इतर राजकारणी व शरद पवार यांच्यात बराच फरक आहे. पुत्रप्रेमाचा तितका मोह शरद पवारांना आज पर्यंत राहिला नाही. अजित पवार राजकारणात गेल्या चाळीस वर्षापासून आहेत. सुप्रिया सुळे ह्या पंधरा वर्षापासून राजकारणात आहेत. खा. सुळे यांना पहिल्यांदा खासदार म्हणुन राज्यसभेवर घ्यायचं होतं, तेव्हा राज्यातून त्यांना बिनविरोध निवडण्यात आलं होतं. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे याचं राजकारणात कितीही हाडवैर असलं तरी त्यांनी आपल्यातील मैत्रीचे धागे तुटू दिले नाहीत. सुप्रिया सुळे यांना राज्यसभेवर पाठवायचं होतं, तेव्हा, बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या मनाने आपला उमेदवार दिला नव्हता आणि भाजपाला सुध्दा देवू दिला नव्हता. आपली पोरगी राज्यसभेवर जात आहे याचा मला आनंद आहे असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. या निवडीबाबत भाजपाची काही अडचण येणार नाही ना असा प्रश्न पवारांनी ठाकरे यांना विचारला असता. ठाकरे म्हणाले होते कमलाबाईचं मी बघतो, त्याची तुम्ही काळजी करु नका. इतका मोठा दिलदार पणा ठाकरे यांच्यात होता. आज तसा राजकीय दिलदारपणा पहावयास मिळत नाही. उलट राजकारणापेक्षा घरातील वडीलधार्यावर खालच्या पातळीवर बोलण्याची नवीन पध्दत रुढ होवू लागली हे दुर्देवं म्हणावं लागेल. अजित पवारामुळेच पवारांनी सुप्रिया सुळे यांना केंद्रात पाठवले असावे. 2004 आणि 2009 या दोन्ही निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेस पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. पवारांच्या मनात आलं असतं तर त्यांनी महिला म्हणुन खा. सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली असती पण त्यांनी तसं केलं नाही.
#पवार एकटे लढले !
2019 ची निवडणुक काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी कठीण होती. या दोन्ही पक्षाचे बरेच नुकसान होणार हे ठरलेेले होते. राज्यातील जनतेचा कौल भाजपा आणि शिवसेनेकडेच होता. त्यामुळे या दोन्ही पक्षाचे वीस, वीस आमदार निवडून येतात की नाही असं वाटत होतं. पवारांनी स्वत: मैदानात उतरुन निवडणुका हातात घेतली. काँग्रेसचं राजकारण पुर्णंता बुडाल्यासारखचं होतं. कॉग्रंसेचं बडे, बडे शिलेदार आपल्याच मतदार संघात आडकून पडले होते, ते स्वत:च निवडून येतात की, नाही असं वाटत होतं. पवारांनी राष्ट्रवादीसह कॉग्रेंस या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला आणि कशी तरी लाज राखली. राष्ट्रवादीच्या 54 तर काँग्रेसच्या 44 जागा निवडून आल्या होत्या. इतक्या जागा निवडून आल्या त्या शरद पवार यांच्यामुळे, अजित पवार किंवा छगन भुजबळ यांच्यामुळे या जागा निवडून आलेल्या नाहीत याचा विचार केला पाहिजे. सातार्याची प्रचार सभा देशातच नव्हे जगात गाजली. एक वयोवृध्द राजकारणी भरपावसात प्रचार सभा घेतात. याचं जनतेला नवल वाटलं. सातार्याच्या जनतेने लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयराजे भोसले यांचा पराभव करुन त्याठिकाणी श्रीनिवास पाटील यांना निवडून दिलं. हा करिष्मा फक्त पवारांचा होता.
#हे नवल नाही का?
राष्ट्रवादी कॉग्रेंस पक्ष सतत पंधरा वर्ष राज्याच्या सत्तेत होता. यात महत्वाची खाते अजित पवार यांच्याकडे होती. जलसिंचन खात्यात अनेक कामे चुकीच्या पध्दतीने करण्यात आली होती. जलसिंचनात कोटयावधीचा भ्रष्टाचार झाल्याचं प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी उकरुन काढलं होतं. 2014 च्या निवडणुकीत फडणवीस यांना अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा कामी आणता आला. राष्ट्रवादी व अजित पवार हे भ्रष्टाचारी आहेत असं रान फडणवीस यांनी उठलं होतं. अजित पवारांच्या विरोधात कुणी तरी रोखठोक बोलतयं म्हणुन फडणवीस यांची वाहवाह केली जात होती. आमची सत्ता येतात आम्ही अजित पवारांना जेलमध्ये टाकू असं फडणवीस वारंवारं सांगतं होते, त्यांच्या भ्रष्टाचाराचे गाडीभर पुरावे आपल्याकडे आहेत, असं ही त्याचं म्हणणं होतं. 2014 ला भाजपा,शिवसेनेचं सरकार आलं, फडणवीस पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहिले. त्यांनी अजित पवारांना साधी नोटीस ही पाठवली नाही. फडणवीस यांच्या सर्व बाता हवेत विरुन गेल्या. 2019 च्या निवडणुकीत राजकीय गणीत बरचं बिघडलं होतं. राजकीय गुंतागुंतीत फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे शपधविधी घेतला. त्यानंतर आता पुन्हा अजित पवारांना उपमुख्यमंत्री म्हणुन शपथ देण्यात आली. कालचे भ्रष्टाचारी अजित पवार यांना भाजपाने सहकार्य म्हणुन मंत्रीमंडळात घेतले. राज्याच्या विकासासाठी आम्ही हे सर्व करत आहोत असं भाजपावाले तोंड वर करुन सांगत आहेत म्हणजे ही लाज वाटणारी बाब नाही का? भ्रष्टाचारी म्हणुन ओळखल्या जाणार्या अजित पवार यांच्या बद्दल भाजपात कसं काय प्रेम उतू आलं? छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना भ्रष्टाचार प्रकरणी नोटीसा पाठल्या होत्या. तरी त्यांचा भाजपाच्या गोटात सन्मान होत आहे हे नवलच नाही का? भ्रष्टाचार्यांचा भाजपात मान राखला जातो व त्यानां मंत्रीपद दिले जातात हे जगात प्रथमच घडत आहे.
#स्वत:चा पक्ष स्थापन करायचा?
पक्षातून बंडखोरी करुन इतर पक्षात गेलेले अनेक नेते बघितते पण ज्या पक्षात आहोत त्या पक्षातील आमदारांना सोबत घेवून त्याच पक्षावर दावा सांगणारे तुरळक असतात. पक्ष फुटीच्या एका वर्षात दोन घटना घडल्या. वर्षापुर्वी एकनाथराव शिंंदे यांनी शिवसेना फोडून चाळीस आमदार भाजपाच्या सोबतीला नेवून बसवले. भाजपाने शिंदे यांना बक्षीस म्हणुन राज्याचं मुख्यमंत्रीपद बहाल केलं. शिंदे यांच्यात खरी ताकद होती, तर त्यांनी आपला वेगळा पक्ष स्थापन करायला हवा होता, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांना आपल्या ताकदीचा अंदाज असेल म्हणुन त्यांनी शिवसेनेवर दावा करुन हा पक्ष बळकावला. तशीच घटना राष्ट्रवादीत घडू लागली. अजित पवार यांनी पक्ष फोडून पक्षावर दावा सांगायला सुरुवात केली. अजित पवार यांनी स्वत:चा वेगळा पक्ष स्थापन करायला हवा होता. स्वत:चा पक्ष असल्यावर मग आपली ताकद कळते. दुसर्याच्या जिवावर जास्त दिवस मोठं होता येत नसतं. राष्ट्रवादी शरद पवारांनी स्थापन केली, त्यात त्यांची आज पर्यंतची मेहनत आहे. शिवसेना पक्ष स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला. ठाकरे यांनी शेवटच्या श्वासपर्यंत पक्ष वाढवण्याचं काम केलं. या दोन्ही पक्षावर पुढच्या पिढ्यांनी दावा करणं म्हणजे अजब नाही का? पक्ष नेत्यांच्या नव्हे कार्यर्त्याच्या जीवावर मोठा होत असतो. कार्यकर्ते नेत्याकडे पाहून पक्षाशी जोडले जात असतात. ठाकरे आणि पवार यांच्यामुळे त्यांचे पक्ष वाढलेले आहेत याचा विसर अजित पवार, एकनाथ शिंदे यांना पडला असावा? सत्तेच्या वळचणीला गेल्यानंतर अजित पवार व शिंदे यांच्या अंगात बळ आलं असेल पण हे बळ निष्क्रीय ठरणारं आहे. भाजपा या दोघांचा ही वापर करुन नंतर त्यांना अडगळीत फेकून दिल्याशिवाय राहणार नाही. भाजपाला स्वत:चा पक्ष वाढवायचा आहे, त्यांना इतर पक्षाच्या नेत्यांना मोठं करायचं नाही.
#पवार धुरंधर नेते
देशात राजकीय चाणक्य म्हणुन शरद पवार याचं नाव घेतलं जातं. केंद्रात पवारांची ताकद कमी असेल पण त्यांचा मान नक्कीच मोठा आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडली. त्याचं तितकं हायस पवारांना वाटलं नाही. कारण त्यांच्यासाठी असले आव्हाने नवीन नाहीत. पन्नास वर्षाची राजकीय कारकीर्द पवारांची आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक चढउतार पाहितले आहेत. आपण पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू असं वक्तव्य पवारांचं येतं म्हणजे कार्यकत्यासाठी एक टॉनीकच आहे. पवारांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे. तो ही सगळ्याच जाती धर्मामध्ये आहे. या वयात पवार तरुणासारखे दौरे करतात. अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडल्याने त्याचं हे गैरकृत्य कोणालाच आवडलं नाही. भले ही आज अजित पवारांच्या पाठीमागे सत्तेचं बळ असेल मात्र पक्ष फोडल्याने अजित पवार यांची लोकप्रियता कमी झाली. उलट शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्या लोकप्रियेत वाढ झाली. पवारांनी आज पर्यंत भल्या, भल्यांना अस्मान दाखवलं. राजकारण कसं करायचं हे पवाराकडून शिकलं पाहिजे. कोणाला कशी मात द्यायची आणि कोणाला कसं निवडून आणायचं याचं गणीत पवारांनाच चांगलं माहित आहे. पवारांशी पंग घेवून अजित पवार यांनी स्वत:च नुकसान केलं. कशाचाही थागपत्ता लागू न देणारे पवार इतके सोपे नाहीत की, त्यांचा सहन पराभव करता येईल? पवार काय चीज आहेत हे येणार्या काळत नक्कीच दिसून येईल. पवार शांत बसणारे व्यक्तीमत्व नाहीत.