बीड (रिपोर्टर): जिजाऊ मॉ साहेब कॉ.आप.क्रेडीट सोसायटीमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या अपहाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिता शिंदे, बबन शिंदे, मनिष शिंदे यांच्या नावावर असलेल्या स्थावर मालमत्तेचा शोध पोलीस घेत असून जनतेला त्यांच्या स्थावर मालमत्तेची माहिती असल्यास त्याची माहिती तत्काळ तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक हरीभाऊ खाडे (मो. क्र. 9823082398) व गुन्हा अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव (मो. नं. 9637999330) या क्रमांकाला देण्याचे आवाहन थेट पोलिसांनीच केले अहे.
बीड व नेकनूर येथील शाखांमधून ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेचा अपहार सोसायटीचे सर्वेसर्वा बबन शिंदे, त्यांच्या पत्नी तथा अध्यक्ष अनिता शिंदे व त्यांचा मुलगा मनिष शिंदे यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आतापर्यंत 200 पेक्षा अधिक ठेवीदारांनी रितसर तक्रार करून 30 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या अपहाराची नोंद झाली आहे मात्र दीडशे कोटींपेक्षा जास्त रुपयांचा अपहार या सोसायटीमध्ये झाल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणातील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून अन्य आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. त्याचबरोबर या तीन प्रमुख आरोपींच्या स्थावर मालमत्तेचा शोधही पोलीस घेत आहेत. शिंदे कुटुंबियांकडे असलेल्य स्थावर मालमत्तेबाबत कोणाला माहिती असल्यास पोलिसांना त्याची माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधिक्षक कार्यालयामार्फत काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
जिजाऊ मॉ साहेब ठेवीदारांची
रविवारी महत्वपूर्ण बैठक
बैठकीला उपस्थित रहा -अॅड. आप्पासाहेब जगताप
जिजाऊ मॉ साहेब को.ऑप. सोसायटीमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला. या प्रकरणी दोनशेपेक्षा अधिक जणांनी पोलिसात रितसर तक्रार दिली. आणखी कित्येक ठेवीदारांच्या ठेवी सदरच्या बँकेत असून दीडशे कोटींपेक्षा जास्त रुपयांचा अपहार सोसायटीमध्ये झाल्याचे सांगण्यात येते. त्याअनुषंगाने ठेवीदारांची एक महत्वपूर्ण बैठक रविवार दि. 16 जुलै रोजी आशिर्वाद मंगल कार्यालयात ठेवण्यात आली आहे.
सकाळी अकरा वाजता ही बैठक आयोजीत करण्यात आली असून या बैठकीमध्ये एकूण ठेवीदार किती ? त्यांच्या ठेवी किती? गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे काय करायचे, आपल्या ठेवी परत मिळतील यासाठी कायदेशीर लढाई कशी लढली जाईल? आरोपींसह संचालक मंडळाच्या स्थावर मालमत्तेला अटकाव कसा घालता येईल? आरोपींची अटक आणि त्यांना जामीन न मिळू देणे त्याचबरोबर त्यांची स्थावर मालमत्ता शोधण्यासाठी नार्को टेस्टची मागणी करणे, मोर्चे, निषेध, उपोषण यासह पुढील रणनीती ठरवण्याबाबत सदरची बैठक असून रविवार दि. 16 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता सोमेश्वर मंदिराच्या बाजुला असलेल्या आशिर्वाद मंगल कार्यालय या ठिकाणी ही बैठक होणार आहे. या बैठकीस सर्व ठेवीदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अॅड. आप्पासाहेब जगताप यांनी केले आहे.