मुंबई (रिपोर्टर) महाविकास आघाडीतच राहिलो असतो तर अजित पवारांनी शिवसेना संपवली असती. निधीवाटपात अजित पवारांकडून भेदभाव केला जात होता. शिवसेनेच्या आमदारांना निधीच दिला जात नव्हता, असे आरोप करतच शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला. मात्र, तेच अजित पवार आज शिंदे सरकारमध्ये अर्थमंत्री झाल्याने शिंदे गटाच्या आरोपांचे काय झाले? असा प्रश्न विचारला जात आहे. या सर्व आरोपांवर आज उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनीच भाष्य करत शिंदे गटाला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला.
शिंदे गटाने केलेल्या आरोपांची एकप्रकारे कबुलीच देत अजित पवार म्हणाले की, जो काम करतो तोच चुकतो. जो काम करत नाही तो बिनचूक राहणारच ना. मला तर पहाटे 5 वाजेपासून काम करण्याची सवय आहे. शिंदे गटाच्या आमदारांच्या माझ्याबाबत ज्या काही तक्रारी असेल त्याकडे मी लक्ष देईल. त्या तक्रारीत थोडेही सत्य असेल तर कोणतेही आढेवेढे न घेता मी चूक कबुल करेल. पुन्हा याबाबत त्यांची तक्रार येणार नाही, याची खबरदारी घेईल.
अजित पवार म्हणाले, शिंदे गट व आम्ही आता सोबत आहोत. त्यामुळे आमच्यामध्ये कटुता राहणार नाही. याची खबरदारी आम्ही घेऊ. आपण सर्वजण आता जनतेसाठीच काम करत आहोत. जनतेच्या कल्याणासाठी, विकासासाठीच आपल्याला काम करायचे आहे. त्यामुळे भेदभाव करण्याचे कारणच नाही.अजित पवार म्हणाले, कोणत्याही आमदाराला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटाच्या आमदारांची व आमची बैठक होणार आहे. तेव्हा त्या सर्वांना विश्वासात घेतले जाईल. त्यांची जी काही नाराजी असेल ती दूर केली जाईल.