बीड (रिपोर्टर): शहरातील सुपरिचित असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उर्दू अदब चे साहित्यिक, लेखक व शायर सय्यद हसीन अख्तर यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर स्वीकृत सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 कलम 40(2) मधील तरतुदीनुसार दिनांक 15 जुलै 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने उर्दू अभ्यास मंडळावर नियुक्ती केलेल्या सदस्यांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात बीड शहरातील सय्यद हसीन अख्तर यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
सय्यद हसीन अख्तर हे उर्दू चळवळीत गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय सहभागी आहेत. उर्दू भाषेची महत्ता आणि विकास या दोन्ही दृष्टिकोनातून ते सातत्याने कर्तव्यरत आहेत. बीड शहरात प्रत्येक गल्ली आणि चौकांमध्ये त्यांनी उर्दू भाषेतून नाम फलक लावलेले आहेत. शिवाय उर्दू मुशायरे, उर्दू, लेखक आणि कवी संमेलनामध्ये ते आवर्जून सहभाग नोंदवितात. काही महिन्यांपूर्वीच दिल्ली येथे हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध लेखक तथा गीतक जावेद अख्तर आणि नायिका तथा सामाजिक कार्यकर्त्या शबाना आजमी यांच्या प्रमुख उपस्थितीत सुद्धा त्यांनी दिल्ली येथील तीन
दिवसीय संमेलनात सक्रिय सहभाग नोंदविला होता. उर्दू चळवळीसाठी ते नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उर्दू विभागामध्ये त्यांची स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे समाजातील सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांना मोठ्या प्रमाणात हृदयी शुभेच्छा दिल्या जात आहेत.