राजकारणाचा महिमा वेगळाच असतो. ज्यांना जमतं ते बरोबर राजकारणातून आपला स्वार्थ आणि फायदा करुन घेतात. जे राजकारणी आपल्या तत्वाला आणि नीतीला बांधून असतात ते मात्र आपल्या विचाराची मर्यादा कधीच ओलांडत नाहीत. त्यांना सत्तेची कितीही आश्वासने दाखवली तरी ते सत्तेकडे जात नाहीत, किंवा आपल्या विचाराशी द्रोह करत नाहीत हे विशेष आहे, असे राजकारणी बोटावर मोजण्या इतकेच आहेत, हे दुर्देव म्हणावं लागेल. राजकारण हा निव्वळ टाईमपास आणि लोकांना मुर्ख बनवण्याचा धंदा झाला. वर्षातून तीन अधिवेशनं होतात. अधिवेशनाचा अर्धा टाईम गोंधळ घालण्यात आणि बहिष्कारात जातो. अधिवेशनाच्या कार्यकाळात एका मिनिटाला लाखो रुपयाचा खर्च होत असतो हे सगळे पैसे राज्यातील जनतेच्या टॅक्समधून खर्च होत असतात. पावसाळी अधिवेशन परवा पासून सुरु झालं. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी चहापाण्याचा कार्यक्रम असतो. प्रत्येक विरोधक चहापाण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालूनच पुढे जात असतात. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुुरुवात ही गोंधळने होवून दिवसभर कार्यक्रम स्थगित केला जातो. राजकारणातला विरोध हा फक्त लोकांना दाखवण्यापुरता झाला. त्यात कुणी पक्का वैरी किंवा विरोधक नसतोच हे तीन वर्षात जास्त दिसून आलं. कालची शिवसेना म्हणजे आजचा ठाकरे गट 2019 साली काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत गेला होता. त्यात मुख्यमंत्री म्हणुन ठाकरे यांनी नियुक्त केली होती. शिवसेनेने आता पर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रचंड विरोध केला. शेवटी सत्तेला जवळ करुन ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला जवळ केले. दोन ते अडीच वर्ष तीन पक्षांनी सहमतीने सरकार चालवलं. एक वर्षापुर्वी राज्यात बंड होवून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली व भाजपाशी संधान साधून स्वत: मुख्यमंत्री झाले. शिंदे यांनी अडीच वर्ष भाजपाला विरोध केला. अगदी खालच्या पातळीवर जावून त्यांनी भाजापावर आरोप केले, तेच शिंदे, भाजपाच्या जवळ गेल्याने त्यांना आपला पुर्व इतिहास विसरावा लागला. झालं गेलं विसरुन जा, असं त्यांनी भाजपाला सांगितलं असेल. तसास प्रकार राष्ट्रवादीच्या बाबतीत झाला. अजित पवार काल पर्यंत म्हणजे बंडखोरी करण्याच्या दोन दिवस आधी सरकारवर टिकेची झोड उडवत होते. असलं सरकार कधीच पाहितलं नाही असं म्हणुन भाजपावर तुटून पडत होते. आज तेच अजित पवार भाजपाचे गुणगुण गातात. मोदी किती चांगले पंतप्रधान आहेत असं सांगत आहेत. सत्तेत गेल्यानंतर माणसात किती बदल होतो हे शिंदे, अजित पवार यांच्या वर्तनावरुन दिसून आलं. सत्ता ही नशा आहे, या नशेसाठी राजकारणी नको ते उद्योग करायला तयार असतात, हे राज्यातील जनतेने तीन वर्षात पाहितलं आहे.
#आता भुजबळ काय म्हणणार?
भुजबळांचा भाजपावर लई राग होता. दोन वर्ष भुजबळ जेलमध्ये होते. दिल्लतील महाराष्ट्र सदनात भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर प्रमुख आरोप होता. इतर काही प्रकरणं त्यांची बाहेर काढण्यात आली होती. त्यांची बेहिशोबी मालमता चांगलीच गाजली होती. भुजबळ यांना दोन वर्ष जेलमध्ये राहावे लागल्याने भुजबळ बाहेर येताच त्यांनी भाजपाच्या नेत्यावर आणि तपास यंत्रणेवर आरोप केले. आपल्याला कसे अडकवण्यात आले, याची माहिती ते सभा घेवून देत होते. महाआघाडीत त्यांना प्रमुख खातं देण्यात आलं होतं. महाआघाडीचं सरकार पडल्यानंतर त्यांनी भाजपाला दोष देणं सुरु केलं होतं. भुजबळ हे शरद पवार यांचे निकट वर्तीय समजले जात होते. अजित पवार आणि भुजबळाचं कधीच जमलं नाही, तरी ही त्यांनी सत्तेसाठी अजित पवार यांच्या सोबत जाणं पसंद केलं. काल जे भुजबळ भाजपाला शिव्या, शाप देत होते, आज अंधारातून भाजपाची माफी तर मागणार नाही ना? काल जे झालं ते राजकारण होतं, त्याला तुम्ही विसरुन जायलं हवं असं त्यांनी फडणवीस यांना कानात सागितलं नाही ना? ओबीसी समाजाचं केंद्रातील सत्ताधार्यांनी नुकसान केलं याचा पाढा देखील ते अधून मधून वाचत होते. आता तो पाढा भुजबळ वाचणार नाहीत. त्यांना ही अजित पवार यांच्यासारखंच म्हणावं लागेल. पंतप्रधान मोदी यांच्या सारखा पंतप्रधान जगात नाही.
#शिंदे समर्थकांना तोंडच राहिले नाही
सत्तेत गेल्यानंतर शिंदे समर्थक जोर बैठका काढत होते. दोन, चार दिवसाला त्यांच्यातील एखादा मंत्री मीडीयासमोर येवून बोलत होता. आम्ही कसे चांगले आहोत आणि आघाडीचे नेते कसे वाईट होते हे सांगत होते, त्यात केसरकर, असतील किंवा गुलाबराव पाटीलसह अन्य नेते आपली भुमिका अगदी पध्दतशीरपणे सांगत होते. लोकांना वाटावे यांनी खुपच वनवास भोगला. आता अजित पवार व त्यांचा गट सत्तेसोबत आल्याने सर्व शिंदे समर्थकांचे चेहर उतरले आहेत. काल हासणार्यांना आज काय करावे हेच कळेना? पवार भाजपासोबत आल्याने शिंदे व त्यांच्या सर्मथकांचे नुकसान होणार आहे? काही मंत्र्यांची जास्तीचे खाते काढून ते पवार गटांना देण्यात आले, येत्या काही दिवसात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारात शिंदे गटाला तितका मान मिळेल असं वाटत नाही. 13 आमदारावर निलंबनाची कारवाई झाली तर सगळंच पाण्यात जाणार आहे. एखाद वेळेस शिंदे याचं मुख्यमंत्रीपद जावून ते अजित पवार यांच्याकडे येवू शकतं, असं झालं तर शिंदे व त्यांच्या सर्मथकांना रडण्याची वेळ येवू शकते? शिंदे गटावर जेव्हा रडण्याची वेळ येईल तेव्हा त्याचं कोणालाच दु:ख वाटणार नाही?
#मुश्रीफ बिनधास्त झाले !
ईडी, सीबीआयच्या धाकाने अनेक नेते भाजपासोबत गेले. मनात नसतांना काहींना भाजपा सोबत जावे लागले. आज भाजपा सोबत गेलो नाही तर उद्या जेलमध्ये जावे लागले याची भीती काही नेत्यांना होती. तीन वर्षात बहुतांश पुढार्यांच्या झोपा उडालेल्या आहेत. ईडी, सीबीआय आपल्या दारात येतात की काय याची त्यांना धास्ती होती. हसन मुश्रीफ कोल्हापूर येथील राष्ट्रवादीचे वजनदार नेते. आघाडीच्या कार्यकाळात त्यांच्याकडे महत्वाचं खातं होतं. आघाडीची सत्ता जाताच त्यांच्या भोवती चौकशीचा फास आवळण्यात आला. त्यांची अनेक वेळा चौकशी करण्यात आली. जेव्हा मुश्रीफ यांची चौकशी करण्यात आली होती, तेव्हा त्यांनी प्रचंड आगपाखड करत अल्पसंख्याकांना टार्गेट करत असल्याचा आरोप केला. भाजपा हा जाणून बुजून अल्पसंख्याकांना बदनाम करत आहे असाही त्यांचा आरोप होता. मुश्रीफ हे पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. राजकारणात त्यांची उंची वाढली ती शरद पवार यांच्यामुळेच. अजित पवार यांच्या सोबत ते ही गेले. त्यामुळे लोकांना आश्चर्य वाटले. पवार बद्दल भावना व्यक्त करतांना मुश्रीफ यांच्या डोळ्यात पाणी आले होते, तेच मुश्रीफ बंडखोर निघाले याचं जनतेला नवल वाटलं. त्यांच्यामागे चौकशीचा फेरा लागल्याने त्यांनी भाजपा जवळ केली असा ही काहींनी कयास काढला. भाजपाला विरोधक मानणारे मुश्रम आता भाजपा चांगला आहे असं म्हणतील. आपण विकासाच्या बाजुने आहोत. कोल्हापूरचा विकास खुंटला होता. सत्तेत आल्यामुळे विकास जलद गतीने होईल असं मुश्रीफ म्हणायला मागेपुढे पाहणार नाहीत. काही महिन्यातच हसन मुश्रीफ यांच्यात बदल झाला. या बदलाला काय नाव द्यावे?
#मुख्यम्ंत्र्यांना अडचण नाही का?
राष्ट्रवादीच्या नादी लागून शिवसेनेचं वाटोळं झालं असं एकनाथराव शिंदे हे काल पर्यंत म्हणत होते. दोन्ही काँग्रसेच्या सोबतीमुळे शिवसेना आपल्या मुळ हिंदुत्व विचाराला विसरली असा ही शिंदे यांचा आरोप होता. दुसरी महत्वाची तक्रार होती, अजित पवार हे आपल्या आमदारांना निधीच देत नव्हते. सगळं काही अजित पवारांच्या म्हणाप्रमाणे होत होतं. फक्त नावाला ठाकरे मुख्यमंत्री होते. कारभार पवारच पाहत होते असं शिंदे याचं म्हणणं होतं. ह्या सगळ्या कटकटीमुळे आम्ही वेगळा निर्णय घेतला आणि भाजपाला जवळ केलं, असं शिंदे यांचे नेहमीच वक्तव्य असायचे, एका वर्षात राज्याच्या राजकारणात बदल झाला. ज्या अजित पवारामुळे शिंदे वेगळे झाले. त्याच अजित पवारांच्या सोबतीला बसवण्याची वेळ शिंदे यांच्यावर आली. अजित पवारांना अर्थ खातं मिळू नये म्हणुन शिंदे यांनी बरेच प्रयत्न केले. खाते वाटपाचं सगळं नियंत्रण दिल्लीत होतं. दिल्लीत जावून अर्थ खातं पवारांना देवू नये अशी तक्रार शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केली. त्याचा काहीच फायदा झाला नाही. अजित पवारांनी आपला नेम साधून घेतला. आपल्याला जे हवं आहे तेच त्यांनी मिळवून दाखवलं. त्यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आल्या. अजित पवार आपल्याला वरचढ होणार हे शिंंदे यांच्या लक्षात आले असले तरी शिंदे यांना बळच पवारा सोबत जुळून घ्यावं लागणार आहे. अधिवेशात शिंदे, पवार,फडणवीस सोबतीला दिसून आले. तीन नेत्यांनी एकत्रीत चहा घेतला, हा फोटो नक्कीच पाहण्यासारखा होता. हेच तीन नेते पुर्वी एकमेकांच्या विरोधात वेगवेगळ्या तक्रारी करत होते. या तिन्ही नेत्यांना सत्तेने एकत्रीत आणलं आहे. सत्ता काय करु शकतेे याचं हे जिवंत उदाहारण आहे. या तिन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी एकमेकांवर धावून जात होते, कार्यकर्त्यांना अजुन विश्वास बसत नसेल हे तिन्ही नेते एकत्रीत आल्याचा! कालचा विरोध आज हास्यकल्लोळात विरुन गेला. जनतेने यातून आता तरी काही बोध घ्यावा!