भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; 13 उपाध्यक्ष, 9 सरचिटणीस, 13 सचिवांची घोषणा!
नवी दिल्ली (वृत्तसेवा): पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकांसाठी आता सर्वपक्षीयांकडून मोर्चेबांधणी केली जाऊ लागली आहे. विरोधी पक्षांनीही खछऊख- या नावाने आघाडी करून भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधली आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम ठरावी अशा काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका पुढच्या काही महिन्यांत होणार आहेत. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व महाराष्ट्र अशा काही महत्त्वाच्या राज्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपानंही कंबर कसली असून पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
भारतीय जनता
पक्षाकडून एकूण 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 9 सरचिटणीस व 12 सचिवांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलगुरू व उत्तर प्रदेशमधील आमदार तारीक मन्सूर यांचा समावेश उपाध्यक्ष म्हणून करण्यात आला आहे. तसेच, तेलंगणा भाजपाचे माजी अध्यक्ष बांडी संजय कुमार यांचाही समावेश पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून तीन नेत्यांचा समावेश!
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांचाही समावेश भाजपानं राष्ट्रीय कार्यकारिणीत केला असून त्यांच्याकडे राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच अनिल अँटनी यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला होता. महाराष्ट्रातून विनोद तावडे यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय पंकजा मुंडे व विजया रहाटकर यांचा समावेश राष्ट्रीय सचिव म्हणून करण्यात आला आहे.
कुणाला वगळलं?
एकीकडे देशातल्या विविध राज्यांमधून राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी सदस्यांची निवड करतानाच काही सदस्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेरही काढण्यात आलं आहे. यामध्ये कर्नाटकमधील पक्षाचे नेते सी. टी. रवी व आसाममधील लोकसभा खासदार दिलीप साकिया यांचा समावेश आहे. पक्षाचे बिहारमधील लोकसभा खासदार व माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह यांनाही पक्षाच्या उपाध्यक्षपदावरून हटवण्यात आलं आहे.