रात्री चार टपर्या फोडल्या
नेकनूर (रिपोर्टर): लिंबागणेश परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. एक महिनापूर्वी बँक फोडण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी दोन घरफोड्या झाल्या होत्या. रात्री पुन्हा चार टपर्या फोडून त्यातील काही माल चोरट्यांनी चोरून नेला आहे. या प्रकरणी नेकनूर पोलिस ठण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक महिन्यापूर्वी लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरीची घटना घडली होती. यामध्ये 20 लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. या चोरी प्रकरणाचा अद्यापही तपास लागला नाही. त्यानंतर 30 जुलै रोजी कमलबाई भगवान खिल्लारे यांच्या घरी चोरीची घटना घडली होती. मुळुकवाडी येथील दासू ढास यांच्या घरीही चोरी झाली होती. या घटनेला काही तासांचा अवधी उलटत नाही तोच रात्री चार ठिकाणी टपर्या फोडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अमोल जाधव यांची मोरया पान सेंटर, सागर जाधव यांचे शिवनेरी पान सेंटर, विजय गायकवाड आणि बाबू पवार या दोघांच्या टपर्याही फोडण्यात आल्या आहेत. या चोरी प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान लिंबागणेश परिसरात पोलीस चौकी असताना चोरीच्या घटना कशा वाढल्या? असा प्रश्न उपस्तित होत असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.