मोदींकडून टिळक पुरस्कार देशाला समर्पित
शरद पवारांकडून मोदींचे अभिनंदन
मुंबई (रिपोर्टर): लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड झाली यासाठी मी त्यांचे अंत:करणापासून अभिनंदन करतो, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे हस्तांदोलन झाले तेव्हा हास्यकल्लोळ करत शरद पवारांनी मोदींच्या पाठीवर थाप मारली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी नरेंद्र मोदींनी हा पुरस्कार देशातील नागरीकांना समर्पित करत महाराष्ट्राच्या पावन भूमीला आणि भूमीत जन्माला आलेल्या विभुत्यांना नमन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज टिळक पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी व्यासपीठावर राज्यपाल बैस, शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी येथे येण्याआधी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडुसेठ हलवाई मंदिरात जावून गणपतीचे आशीर्वाद घेतले. हे मंदिर पुण्या जिल्ह्यातील इतिहासाचा महत्वाचा भाग आहे. दगडूसेठ हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी लोकमान्य टिळकांच्या आवाहनानंतर सार्वजनिक गणेश महोत्सवाचे आयोजन करून सार्वजनिक रित्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा केली, मी या पावन भूमीला आणि भूमीत जन्माला आलेल्या विभुत्यांना नमन करतो. हा पुरस्कार देशातील जनतेला समर्पित करत असल्याचे सांगून पुणे आणि काशीला विशेष ओळख असल्याचे मोदींनी म्हटले. तर शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार नरेंद्र मोदींना देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी केली. या पुरस्कार मिळालेल्यांच्या यादीत इंदिरा गांधी होत्या, खान अब्दुल गफ्फार खान, बाळासाहेब देवरस, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहनसिंग होते, अशी अनेकांची नावे घेता येतील. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश झाला. याचा आनंद आपण सर्वांना आहे. त्यामुळे मी सर्वांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी टिळक पुरस्कारासाठी निवड झाली त्याबद्दल त्यांचे अनंत:करणापासून अभिनंदन करतो, असे शरद पवार यांनी म्हटले.