बीड (रिपोर्टर): ‘जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमरावं’ असा संदेश देणारे आणि दीड दिवस शाळेत जावून अजरामर साहित्याची निर्मिती करणारे सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगाने बीड शहरातून ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या ग्रंथ दिंडीने बीड शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. या ग्रंथ दिंडीत अण्णाभाऊ साठेंच्या फकिरा, माकडीचा माळ, वैजंता अशा विश्वविख्यात कादंबर्यांचा समावेश होता. या ग्रंथदिंडीत महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.या ग्रंथदिंडीचा समारोप सुभाष रोडवरील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ होऊन समाजातील अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊंना अभिवादन केले.
सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची आज 103 वी जयंती आहे. अण्णाभाऊंच्या जयंतीच्या अनुषंगाने गेले सात दिवस सार्वजनिक जयंती उत्सव समिती आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीने बीड शहरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज चांदणेचा वाडा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून डीपीआयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांच्या नेतृत्वात अण्णाभाऊंच्या साहित्याच्या ग्रंथाची मिरवणुक पालखीतून ग्रंथदिंडीद्वारे काढण्यात आली. या पालखीचे सारथ्य सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुशिला मोराळे, उत्तम पवार, प्रा. डॉ. पांडुरंग सुतार आणि माजी नगरसेविका प्रेमलता चांदणे यांनी केले. या ग्रंथ दिंडी सोबत सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अमृत काका सारडा, सुभाष लोणके यांचीही उपस्थिती होती. ही ग्रंथदिंडी भव्यदिव्य असून ढोल ताशांच्या गजरामध्ये काढण्यात आलेल्या दिंडीने बीड शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते. या ग्रंथ दिंडीमध्ये युवकांसह महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होत्या. ग्रंथदिंडीचा समारोप अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ पुष्पहार अर्पण करत झाला. तत्पूर्वी समता सैनिक दल आणि रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली भीम सैनिकांनीही अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. अण्णाभाऊंना अभिवादन करताना समाजातील अनेक थोर विभूतींचा समावेश होता. त्यामध्ये रिपाइंचे पप्पू कागदे, योगेश क्षीरसागर, प्रा. पांडुरंग सुता, अशोक हिंगे, मधुकर लोंढे, प्रा. रोडे, अशोक तांगडे, मनिषा तोकले, राहुल मस्के, विजय चांदणे, समितीचे अध्यक्ष अमृतकाका सारडा, समितीचे सचिव सुभाष लोणके आदी मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
अण्णाभाऊंच्या साहित्याची प्रेरणा घेऊन मातंग समाजात साहित्यिक निर्माण व्हावा -सुशिला मोराळे
अण्णाभाऊंनी आपले पुर्ण साहित्य हे क्रांतीकारी विचाराने भरलेले आहे. फक्त दीड दिवस शालेत जावून कथा, कादंबर्या, पोवाडे आणि प्रवास वर्णने यांची साहित्यात मोठी भरणा आहे. अण्णाभाऊंचे साहित्य हे जगातल्या अठरा भाषात लिहिले गेले असून तेथे त्यांचा अभ्यास होत असून रशिया आणि झोकोस्लॉसिया येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अण्णाभाऊंचे धडे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अण्णाभाऊंच्या साहित्याची प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांचा पाईक एखादा साहित्यिक निर्माण व्हावा, अशी अपेक्षा सुशिला मोराले यांनी व्यक्त केली.
धनंजय मुंडेंनी केले अभिवादन
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त परळी वैद्यनाथ शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार व कार्य आम्हाला कायम प्रेरणा देत राहतील, असे यानिमित्ताने धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी वैद्यनाथ स.कारखान्याचे संचालक अजय मुंडे, रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहाराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, के डी उपाडे, पी जी मस्के, हनुमंत गायकवाड, रमेश मस्के, जितेंद्र मस्के, वसंतराव उदार, नानाभाई पठाण, नाजीर हुसेन, सोफीया नंबरदार, शिवसेना शिंदे गटाचे शिवाजीराव शिंदे, वैजनाथराव माने शिंदे, लहुजी क्रांती सेनेचे भागवत वाघमारे, निलेश सगट आदी उपस्थित होते.
साठे यांनी उपेक्षितांचे दुःख साहित्यातून मांडले -पप्पू कागदे
साहित्यसम्राट साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त रिपाइंच्या वतीने युवा रिपाइं प्रदेश अध्यक्ष तथा अनु-जाती जमाती, ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष पप्पू कागदे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून अभिवादन रॅली काढून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. दीड दिवस शाळेत जाऊन वास्तववादी साहित्य निर्माण करणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी 35 कादंबर्या, 15 कथा संग्रह कवितासंग्रह, पटकथा, नाटके पोवाडे, यांच्या माध्यमातून साहित्याचा डोंगर उभा करून उपेक्षितांचे दुःख व व्यथा आपल्या साहित्यातून सर्व समाज घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम केले, असे प्रतिपादन रिपाइं युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केले आहे.
अण्णाभाऊंना भारतरत्न द्या -आजिंक्य चांदणे
केवळ दीड दिवस शाळा शिकून अन्यायाविरुद्ध आपल्या साहित्यातून नायक-नायिका उभा करणार्या जगविख्यात अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात यावा त्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न अहे. त्यासोबत अण्णाभाऊंचे विचारही आम्ही रुजवत आहोत. अण्णाभाऊंच्या साहित्यातून समता निर्माण करण्यासोबतच क्रांतीकारी विचार पेरण्यात आलेले आहेत. याची दखल केंद्र सरकारने घ्यावी, राज्य सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला त्याला आम्हाा यश आलेआहे, असेही आजिंक्य चांदणे यांनी ग्रंथ दिंडीत आपले विचार व्यक्त करताना सांगितले.