खिडकी तुटून टाकीचे अवशेष बाहेर पडले; घराला आग, एक महिला किरकोळ जखमी
शिरूर कासार (रिपोर्टर): सकाळच्या चहापनसाठी पेटवलेल्या गॅसचा अचानक भडका उडाला. अवघ्या काही सेकंदात आगीने अवघ्या किचनला आपल्या विळख्यात घेतले. पुढच्याच क्षणी गॅसच्या टाकीचा जबरदस्त स्फोट झाला. खिडकीची ग्रील तोडून टाकीचे तुकडे घराच्या परिसरात पडले. त्यामुळे त्या स्फोटाची तीव्रता किती होती हे हे यावरून लक्षात येते. घरामध्ये दोन लहान मुले आणि त्यांची आई होती. सुदैवाने जीवीत हानी झाली नसली तरी महिला किरकोळ जखमी झाली असून त्यांच्यावर स्थानीक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरची घटना ही शिरूर येथे आज सकाळी घडली.
याबाबत अधिक असे की, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी अरुण मानकर हे शहरातील शिवाजीनगर भागात कातखडे यांच्या घरामध्ये भाडे तत्वावर राहतात. आज सकाळी ते वॉकिंग करण्यासाठी घराबाहेर पडले होते. या वेळी त्यांच्या घरात पत्नी आणि दोन लहान मुले होते. घरातील गॅस चहापनासाठी पेटवल्यानंतर गॅसचा भडका उडाला. आगीने अवघे किचन आपल्या विळख्यात घेतले. घरातून धूर निघत असल्याने आजुबाजुच्या लोकांनी आरडाओरड केली. तोपर्यंत आगीने मोठे स्वरुप धारण केले होते. त्यात गॅसच्या टाकीचा जबरदस्त स्फोट झाला आणि टाकीचे अवशेष खिडक्यांचे ग्रिल तोडून बाहेर पडले. स्फोटाची तीव्रता एवढी भयानक होती की, परिसरातील लोकांना त्याचा आवाज गेला. या आगीत सुदैवाने घरातील सर्वजण बालंबाल बचावले असून मानकर यांच्या पत्नी किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांना तात्काळ स्थानीक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आग लागल्यानंतर अग्निशामक दलाचे आवश्यकता असते मात्र नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून गेल्या सात ते आठ वर्षात अद्यापही येथील नगरपंचायतीला अग्निशामकची कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे आग विझवण्यासाठी सर्वसामान्यांना मोठे प्रयत्न करावे लागले.