63×66+बघे=किती…?
सभा पडली! सभा जिंकली!!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ‘आधे इधर आधे उधर बाकी मेरे पिछे’ अशी स्थिती थोरल्या पवारांची झाली अन् थोरल्या पवारांच्या उभ्या राजकारणाची गोळाबेरिज राज्याबरोबर देशाने सुरू केली. थोरल्या पवारांचे अविश्वासाचे राजकारण, गणिमीकावा या गोळा बेरजेचे खरे सिद्धांत मांडले जात असतांना उभ्या फुटीत सुरू केलेल्या महाराष्ट्र दौर्यात थोरल्या पवारांना बीडची आठवण आली. 80 च्या दशकात जसा जिल्हा पवारांच्या पाठीशी उभा राहिला तसाच तो चार दशकानंतर आपल्याच पाठीशी उभा असेल असा भाबडा विश्वास घेवून पवारांनी फुटीरवाद्यांविरोधात बीडमध्ये रणशिंग फुंकण्याचे ठरवले मात्र हा चार दशकाचा कालखंड स्मरणात आणला तर भाजपाचे स्व.नेते गोपीनाथ मुंडे, त्यांची कन्या पंकजा मुंडे आणि गेल्या दशकभरापासून बीडवर अधिराज्य करत असलेले धनंजय मुंडे यांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात बीडला ओळखले जावू लागले. फुटीमध्ये बीडमधून केवळ आ.संदीप क्षीरसागर हे नवखे आमदार थोरल्या पवारांच्या तंबूत राहिले. मात्र लढवय्या काफीला आणि शिलेदार पवारांपासून दुर गेले. बीडमध्ये थोरल्या पवारांची राष्ट्रवादी संपली आणि धाकले अजित पवार यांचे नेतृत्व स्विकारत 90 टक्के राष्ट्रवादीने कामाला सुरूवात केली. म्हणूनच बीडमधून पवारांनी महाराष्ट्राच्या दौर्याला सुरूवात केली. पवार काय बोलणार? कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कुठले कटाक्ष टाकणार? टीका काय असणार? याकडे गेल्या आठ दिवसांपासून उभ्या राज्याचे लक्ष लागून होते. मात्र काल पवार आले, अनेक ठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागतही झाले, मात्र व्यासपिठावर अवघ्या 11 मिनिटाच्या भाषणात पवारांनी ‘परळीत गुंडगिरी चालते’ एवढा शब्द उच्चारला मग ही गुंडगिरी स्व.मुंडेंची, पंकजा मुंडेंची, धनंजय मुंडेंची की आत्ता राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेले गित्तेंची? खरं पाहिलं तर पवार उभ्या फुटीतून अंगावर आलेल्यांना शिंगावर घेणे अपेक्षित होते मात्र थोरल्या पवारांनी ताकाला जावून भांडे लपवलेले दिसले आणि तिथेच सभा पडली.
बीड शहरात आजपर्यंत मोठमोठ्या नेत्यांच्या सभा या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम, अटलबिहारी वाजपेयी ग्राऊंड, चंपावती ग्राऊंड अथवा अन्य खुल्या मैदानात होताना दिसून आल्या. माने कॉम्प्लेक्स परिसरातली सभा म्हणजे सभा यशस्वी होईल की नाही या भितीने तयार केलेले नियोजन अशी व्याख्या माने कॉम्प्लेक्स परिसराची होवून गेलेली आहे, आणि त्याच ठिकाणी आ.क्षीरसागरांनी पवारांची सभा ठेवली. देशाचे नेते 63ु66 खुर्च्यांच्या व्यासात सामावणे हे गलीतगात्रचे लक्षण होय! पवारांच्या या जाहीर सभेतून अनेक सिद्धांत बोलले गेले. मांडले गेले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘पुन्हा येईल’ या आत्मविश्वासावर आसूडही ओढण्यात आले. ‘नरेंद्रचे देवेंद्र’ होणे निश्चित हा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला. केंद्र सरकारची भुमिका, तोडाफोडीचे राजकारण, मणीपूरचे प्रकरण या सभेतले प्रमुख आकर्षण माध्यमांसाठी राहिले. मात्र माध्यमांना ज्या खुराकाची गरज होती तो खुराक व्यासपिठावरून थोरल्या पवारांनी दिला नाही. माध्यमांना
खरा तर खुराक न देणे हाच खरा खुराक मिळाला. पवारांनी एक केलं, शिवछत्रला छेद देण्याहेतू ‘माझे वय झाले, त्यांनी माझं काय पाहितलं’ (नॉनव्हेज) या वाक्यातून अमरसिंह पंडितांना आपण आपल्या डोक्यात घेतल्याचे उभ्या जिल्ह्याला दाखवून दिले. इथंही ते थांबले नाहीत तर अमरसिंह पंडितांचे कट्टर विरोधक म्हणून ज्या बदामराव पंडितांकडे पाहितलं जातं त्या माजी मंत्री बदामराव पंडितांच्या निवासस्थानी जावून त्यांना बळ देण्याचे आश्वासित केले. शरद पवारांची कालची सभा ही अजित पवार यांच्या पाठीशी उभा असलेल्या नेत्यांची लचके तोडणारी होईल असा जो थोरल्या पवार समर्थकांचा समज होता तो समज फोल ठरला. होय, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागरांनी थोडी छेड काढली खरी परंतु यातून गाजावाजा केलेल्या सभेला भरती आली नाही. सभा बहुसंख्य झाली. हा आनंद थोरल्या पवार समर्थकांचा असेल तर माने कॉम्प्लेक्स परिसरात किती लोकं बसतात? परळीवरून गितेंनी सातशे गाड्या आणल्या, 700 गुणिले 10 इथेच सात हजार झाले तर बीडचे अन् अन्य तालुक्यांचे सभेला किती लोक? असे एक ना अनेक प्रश्न थेट सोशल माध्यमातून विचारले जाऊ लागले. एक मात्र खरे, सभा आणि सभेसाठी उभारलेला मंडप, त्यातले सोफे, व्यासपीठ अन् खुर्च्या देखण्या होत्या. सभेतून थेट हल्ला झाला नाही, पक्षातून साथ साोडणार्यांना प्रश्न विचारण्यात आले नाहीत, यामुळे सभा नक्कीच पडली. मग थोरल्या साहेबांची ही सभा जिंकली कुठे? काल थोरल्या पवारांनी सवाल केले असते, हल्ला चढवला असता आणि स्वाभिमानी सभेत अभिमान भरला असता तर त्या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार गट जो बीडमध्ये सभा घेण्याच्या तयारीत आहे त्याला उत्तर देण्याहेतू प्रश्न मिळाले असते, खाद्य मिळालं असतं ते अजित पवार गटाला मिळाला नाही, इथे सभा जिंकली.