गेवराई (रिपोर्टर) : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या दोघांना अज्ञात पिकअपने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटे गेवराई-उमापूर-शेवगाव रस्त्यावर हवाले वस्ती जवळ घडली. यातील मयत गोपाळ माधवराव राऊत हे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा गावातील प्रसिद्ध व्यापारी होते.
याबाबत अधिक असे की, उमापूर येथील ग्रामपंचायतचे माजी सदस्य तथा व्यवसायिक गोपाळ राऊत व त्यांचे सहकारी रोजच्या नुसार आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. ते गेवराई-उमापूर-शेवगाव रस्त्यावरील हवाले वस्ती नजीक आले असता भरधाव वेगात आलेल्या अज्ञात पिकअपने त्यांना जोराची धडक दिली आणि तो पिकअप घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातात गोपाळ माधवराव राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा सहकारी मनोज रमण पाटणी हा गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले गोपाळ राऊत हे गावातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम अग्रेसर असतात. त्यांच्या अपघाती निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.