बीड (रिपोर्टर): जिल्ह्यातील 1064 ग्रामपंचायतींचे लेखा परिक्षण झालेले आहे. त्यापैकी रोजगार हमीच्या कामाच्या लेखा परिक्षणामध्ये 464 ग्रामपंचायतींचे आक्षेप निघाले. या आक्षेपांची तपासणी काल दिवसभर जिल्हा परिषदेमध्ये होऊन त्यात 209 ग्रामसेवकांनी आक्षेप खोडून काढले नाहीत. त्यामुळे हे 209 ग्रामसेवक चौकशीच्या फेर्यात अडकलेले आहेत.
रोजगार हमी योजनेची कामे ज्या ज्या ग्रामपंचायतींनी केली, त्यामध्ये पांदण रस्त्यापासून घरकुलाच्या योजनेच्या कामांचा समावेश आहे. घरकुलाचे काम प्रत्येक ग्रामपंचायतीने केलेले आहेत. त्यामुळे या रोजगार हमी योजनेच्या कामाचे लेखापरिक्षण करताना 464 ग्रामपंचायतींचे लेखा परिक्षणामध्ये दोष आढळून आले. त्यातील 464 पैकी 209 ग्रामपंचायती आणि ग्रामसेवक यांना लेखा परिक्षणातील दोष पुराव्यासह खोडून काढता आले नाहीत. यापैकी काही ग्रामसेवकांनी कामाच्या बदल्यामध्ये बेअरर चेक दिले आहेत त्यामुळे हे 209 ग्रामसेवक चौकशीच्या फेर्यात अडकले असून यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे.