मुंबई (रिपोर्टर)- यंदाच्या वर्षी पावसाने सुरुवातीपासूनच लपंडाव सुरू केला आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे, खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आणि चिंताग्रस्त बळीराजाने शेतात पेरणी केली. मात्र, पेरणीनंतर पाऊस पुन्हा गायब झाला आहे. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडाच जाताना दिसून येतोय. पावसाने उसंत घेतल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. माळरानावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केल्याने बळीराजा पुन्हा चिंताग्रस्त बनला आहे. त्यामुळे, खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलीय.
पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबिन, भुईमूग, नागली, भात पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दररोज उठले की पांढरे शुभ्र आकाश दिसत असल्याने शेतकर्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. पिकांना मारक, तर किडींना पोषक वातावरण असल्याने किडीचा प्रादुर्भाव वाढू लागल्याचे चित्रही बांधावर दिसून येते. राज्यातील सर्वच भागात बळीराजाला पावसाची चिंता लागून राहिली आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
महाराष्ट्रात जुन, जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यातच या ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा सुमारे 68 टक्क्यांनी पाऊस कमी आहे. 1 ते 18 ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा 80 टक्क्यांनी कमी आहे. बहुतेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. हि परिस्थिती भीषण असून शेतकर्यांचे हातचे पीक निघून गेले आहे. हे पाहता या शेतकर्यांना
पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे.यासोबतच महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहिर करुन शेतकर्यांना दिलासा द्यावा, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तसेच परीस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा. पिण्याच्या पाण्याचे टँकर, जनावरांसाठी चारा छावण्या आणि इतर दुष्काळी कामे हाती घेण्यासंदर्भात तातडीने सकारात्मक विचार करुन अंमलबजावणी करावी, अशी मागणीही खासदार सुळे यांनी केली आहे. महाराष्ट्रात जुन, जुलै या महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यातच या ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा सुमारे 68 टक्क्यांनी पाऊस कमी आहे. दि. 1 ते 18 ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा 80 टक्क्यांनी कमी आहे. बहुतेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. दरम्यान, यंदा वरुणराजाच्या मनात काय आहे, हेच कळेना झालंय. जून महिना कोरडा गेला, त्यानंतर जुलैमध्ये बर्यापैकी पाऊस झाल्याने पेरण्या होऊ शकल्या नाहीत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उघडझाप राहिल्याने पिकांची वाढ सुरू झाली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.