राज ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणार्यांना मराठवाड्यात बंदी घाला असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे. सत्तेत असताना या विषयावर बोलायचे नाही, आणि विरोधात गेल्यावर मागणी करायची, असेच आजपर्यंत राजकारणी करत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राजकारणी लोकांच्या नादी लागू नका, असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी केले आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. सकाळी सव्वाआठ वाजता ते चिकलठाणा विमानतळावर पोहोचले होते. त्यानंतर थेट आंदोलन स्थळाकडे रवाना झाले. राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी मनोज जरांगे यांची भेट घेतली. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदलाही मनसेने जाहीर पाठिंबा दिला आहे.
आडगाव जावळेमध्ये राज ठाकरेंचा ताफा थांबवण्यात आला होता. या आधी देखील मार्गावर राज ठाकरे यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला होता. या वेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना आपल्या मागण्यांचे निवेदनही दिले. राज ठाकरे यांनी गाडीतून उतरुन या आंदोलन कर्त्यांची भेट घेतली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. कालच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. तसेच राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. मराठा आंदोलनाला मनसेचा पाठिंबा असल्याचे राज ठाकरे यांनी आधीच जाहीर केला होता.