आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बीडमध्ये छावाकडून जंगी स्वागत
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र
देवून आरक्षण देण्याचीही केली मागणी
बीड (रिपोर्टर)- राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे शनिवारी बीडमध्ये छावा संघटनेकडून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने छाव्यांना आपल्या सोबत घेवून छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक रोमन यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. विशेष म्हणजे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून आरक्षण देण्याचीही मागणी यावेळी अशोक रोमन यांनी केली.
शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची उपस्थिती होती.
ही बैठक संपल्यानंतर ना. तानाजी सावंत हे बीडवरून धाराशिवकडे जात होते. याअनुषंगानेच बीड बायपासवर त्यांचे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अशोक रोमन यांनी जंगी स्वागत केले. जेसीबीव्दारे मोठा हार घालून रोमन यांनी केलेल्या या स्वागताने संपूर्ण बीडकरांचे लक्ष वेधून घेतले होते, विशेष म्हणजे यावेळी मराठा आरक्षणासंदर्भातही रोमन यांनी आरोग्य मंत्र्यांना एक निवेदन दिले आहे. मराठा समाज हा पुर्वीपासून शेती करून तो देशातील नागरिकांची अन्नधान्याची गरज भागवत आहे. अलीकडच्या काळात जमीनीची कमतरता होत असल्याने मराठा समाजाला उदरनिर्वाह व मुला-बाळांचे शिक्षण करणे खुप कठीण होत आहे. तरी अखिल भारतीय छावा संघटना बीड जिल्हा व इतर सर्व मराठा संघटनांच्या वतीने आपणास विनंती करतो की, आपण शासन स्तरावर मा. मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या वचनाचा पाठपुरावा करावा व मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, याकरिता अखिल भारतीय छावा संघटना बीड जिल्हा व सर्व मराठा संघटनांचा आपल्या पुर्णपणे पाठींबा राहील, असा विश्वास यावेळी रोमन यांनी बोलून दाखविला आहे. यावेळी अशोक रोमन यांनी मांडलेल्या मागण्या नक्कीच सरकारकडून सोडवून घेवू, असे आश्वासनही ना. सावंत यांनी दिले आहे. यावेळी बीड शहरासह जिल्ह्यातील छाव्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.