दोन्ही पंडितांसह आ. पवारांच्या निवासस्थानावर जात दिले निवेदन
तहसील कार्यालयावर धडक मारत तहसीलदारांसमोर केल्या भावना व्यक्त
गेवराई (रिपोर्टर)- मराठा आरक्षणासाठी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तालुक्यातील तांदळा येथे समाज बांधवांचे साखळी उपोषण सुरू असून आज तांदळासह परिसरातील 20 ते 25 गावातील मराठा समाजाच्या महिला, पुरुषांनी तांदळा येथून गेवराई इथपर्यंत रॅली काढत माजी मंत्री बदामराव पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, विदद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांच्या निवासस्थानी जात त्यांना आरक्षणाबाबतचे निवेदन दिले. पुढे ही रॅली तहसील कार्यालयावर जावून धडकली. त्याठिकाणी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
सराटे अंतरवली येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गेवराई तालुक्यातील तांदळा येथे साखळी उपोषण सुरू आहे. आज सकाळी या पंचक्रोशीतील 20 ते 25 गावातील नागरीकांनी एकत्रित येत तांदळा ते गेवराई अशी रॅली काढली. गेवराईच्या दसरा मैदानात येत तेथून मराठा समाजाचे महिला-पुरुष थेट माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानावर जावून धडकले.
त्याठिकाणी शांततेच्या मार्गाने आरक्षणाबाबतचे निवेदन बदामराव पंडित यांना देण्यात आले. या वेळी युद्धजीत पंडित, गिरीकाताई पंडित यांच्यासह त्यांचे घरातील सदस्य उपस्थित होते. या वेळी बदामराव पंडित यांनी आमचे संपुर्ण कुटुंब आरक्षणाच्या पाठीशी असल्याचे म्हटले. पुढे आंदोलनकर्त्यांनी माजी आ. अमरसिंह पंडित यांचा ‘कृष्णाई’ बंगला गाठला.
त्याठिकाणी शिवाजीराव पंडित यांच्या कुटुंबाकडून पृथ्वीराज पंडत यांनी निवेदन स्वीकारत आम्ही आपल्या पाठीशी असल्याचे म्हटले. तर इकडे आमदार लक्ष्मण पवार यांच्या निवासस्थानी त्यांच्या पत्नी भाग्यश्री पवार, शिवराज पवार यांनी निवेदन स्वीकारले. तिन्ही लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानानंतर ही रॅली तहसील कार्यालयावर जावून धडकली. त्याठिकाणी तहसीलदारांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. या रॅलीत मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.