बीड (रिपोर्टर)- एनडीए सरकारने 2016 मध्ये देशातील दिव्यांगांच्या कल्याणासाठी, त्यांना त्यांचे हक्क ममिळवून देण्यासाठी व समाजात माणूस म्हणून जगण्यासाठी केंद्र सरकारने विशेष कायदा केला. त्यांची प्रगती व्हावी म्हणून आतापर्यंत सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत सातशे कोटी रुपयांचा विविध योजनांवर खर्च केला असून केंद्र आणि राज्य सरकार विशेष दिव्यांग मंत्रालय स्थापन करत आहे, असे प्रतिपादन केंद्रिय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
बीड येथे एमआयडीसी भागात जिल्ह्यातील अपंगांची तपासणी करून शिबीरातील अपंग लाभार्थ्यांना विविध साधनांचे वाटप करण्यासाठी वैष्णवी पॅलेस येथे एका शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन करताना केंद्रीय सामाजिक मंत्री आठवले हे बोलत होते. या वेळी जिल्ह्याच्या खासदार प्रितम मुंडे, युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, उपस्थित होते. आठवले पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र सरकार अंतर्गत स्वतंत्रपणे दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करून राज्यस्तरावर दिव्यांग आयुक्तालय स्थापन केले आहे. महाराष्ट्रातही स्वतंत्रपणे दिव्यांग कल्याणासाठी डीडीआरसी योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सामाजिक न्याय मंत्रालयातील देशातील 736 जिल्ह्यांमध्ये अनेक योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातही 17 लाख 80 हजार दिव्यांगांना या योजनेचा लाभ दिलेला आहे. त्यामुळे समाजात दिव्यांग बांधव हे आपल्या अपंगत्वाचा न्यूनगंड न बाळगता ताठ मानेने जगू शकतील, असेही या वेळी आठवले यांनी सांगितले. या वेळी बीड जिल्ह्यातील अपंगांचे शिबीर घेऊन काहींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले तर काहींना अनेक साधनांचे वाटपही या वेळी आठवले व खा. प्रितम मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रिपाइंचे राजू जोगदंड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, कुंडलिक खांडे यांच्यासह समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे हे उपस्थित होते.
शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार नाही
अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळालं नसल्याने त्यांनी बंड केलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पद जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यात होत असतानाच आज माध्यमांनी केंद्रिय मंत्री आठवले यांच्याकडे विचारणा केचली असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार नाही , ते मुख्यमंत्रीपदी राहतील, भाजपात कुठलेही मतभेद नाही, शरद पवार यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री पद दिले नसल्याने अजित पवारांनी बंड केले असल्याचे म्हटले आहे.