राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्र्यांकडून जाहीर
बीड (रिपोर्टर)- सत्तेत सहभागी झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादीकडे जिल्ह्याची जबाबदारी आणि पालकत्व मागत होते. आज अखेर पालकमंत्र्यांची खांदेपालट करण्यात आली. बीडचे तत्कालीन पालकमंत्री अतुल सावे यांचे बीडमधील पालकत्वाचे काम अत्यंत निष्क्रीय ठरल्यामुळे बीडला सर्वसामान्यांचे प्रश्न तात्काळ सोडवणारा पालक हवा, असे वाटत असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीडसह राज्यातील अकरा जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर केली आहे. यामध्ये बीडच्या पालकत्वाची जबाबदारी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आली आहे तर पुण्याचे पालकमंत्री हे अजित पवार असणार आहेत.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर बीडचे पालकमंत्री म्हणून भाजपाचे अतुल सावे यांची निवड करण्यात आली होती, मात्र गेल्या एक-दीड वर्षाच्या कालखंडात अतुल सावे हे बीडमध्ये दोन-पाच वेळेस आले असतील.
ओला दुष्काळ असो अथवा कोरडा दुष्काळ असो किंवा अन्य गंभीर घटना घडलेल्या असोत सावे यांचे बीडकडे सातत्याने दुर्लक्ष असायचे त्यामुळे बीडचे पालकमंत्री कोण? हे अनेकांना माहितही नसायचे. त्यामुळे बीडच्या पालकत्वाची जबाबदारी ही जबाबदार आणि कर्तृत्वान लोक-प्रतिनिधीकडे असावी, असे जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकाला वाटत असे, अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर अमरावती आणि सोलापूरची जबाबदारी ही भाजपाचे चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. बीडचे पालकमंत्री म्हणून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. अकोला राधाकृष्ण विखे पाटील, भंडारा विजयकुमार गावीत, बुलढाणा दिलीप वळसे पाटील, कोल्हापूर हसन मुश्रीफ, गोंदीया धर्माराव अतराम बाबा, परभणी संजय बनसोडे, नंदुरबार अनिल पाटील, वर्धा सुधीर मुनगंटीवार यांना पालकत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.