मतदानावरही बहिष्कार, गावच्या मुख्य रस्त्यावर बंदीचे फलक
बीड (रिपोर्टर)- मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधींसह प्रतिष्ठीत पुढार्यांना आमच्या लोणी, शहाजानपूर, रामगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत गावात प्रवेश दिला जाणार नाही व मतदानावर पुर्णपणे बहिष्कार टाकण्याचा निर्धार करण्यात आल्याचे मोठे फलक गावच्या रस्त्यावर लावून बीड तालुक्यातील लोणी शहाजानपूर-रामगाव येथील नागरीकांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक पवित्रा घेतला. संबंधित मागण्यांचे निवेदन त्यांनी तलाठ्यांमार्फत जिल्हा प्रशासन आणि शासन व्यवस्थेकडे पाठविले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जावे, यासाठी राज्यभरात मराठा समाजाने रान उठवले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या चौदा दिवसांच्या उपोषणानंतर राज्य शासनाने या निर्णयाबाबत एक महिन्याचा कालावधी मागितला होता. तो कालावधी 14 ऑक्टोबर रोजी संपत असून जरांगे हे आरक्षण जनजागृतीबाबत राज्यभरात दौरे करत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न पुर्णत: ऐरणीवर आला असून गावागावात रोज आंदोलने होऊ लागले आहेत. आता बहुबहाल मराठा गावांनी थेट शासन आणि प्रशासन व्यवस्थेला कोंडीत पकडण्याचे धोरण आखल्याचे दिसून येत असून बीड तालुक्यातील लोणी-शहाजानपूर-रामगाव येथील गावकर्यांनी थेट गावच्या रस्त्यावर मोठे कटआऊट लावत जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यंत लोकप्रतिनिधींसह राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठीत पुढार्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही, मतदानावरही बहिष्कार टाकण्याचा निर्धार या फलकातून त्यांनी व्यक्त केला आहे. फलकाच्या समोर खुर्चीवर छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळा ठेवण्यात आलेला आहे. या घटनावरून राज्यातील मराठा समाज आरक्षणाबाबत किती आक्रमक आहे हे दिसून येते.