बीड (रिपोर्टर)- नांदेड जिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनाक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील जिल्हाधिकार्यांना त्या त्या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाची व्हिजिट करत अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर रात्री जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. या वेळी लहान मुलांच्या वार्डामध्ये एका बेडवर दोन दोन रुग्ण आढळून आले. स्वच्छता, औषध साठा याबाबत जिल्हाधिकारी समाधानी असल्याचे सांगण्यात येते. दुसरीकडे कर्मचारी आणि डॉक्टरांचा अपुरा स्टाफ पाहता त्यावर शासन व्यवस्था तात्काळ दखल घेईल, असे जिल्हाधिकार्यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांनी अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी अचानक जिल्हा रुग्णालयात रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास डेरेदाखल होत रुग्णालयातल्या प्रत्येक वार्डाची पाहणी केली. बालकांचा जो वार्ड आहे त्या वार्डामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आले. एका बेडवर दोन-दोन तीन तीन रुग्ण पहावयास मिळाले. याबाबत माध्यमांशी बोलताना दीपा मुधोळ यांनी इथली स्वच्छता चांगली असल्याचे म्हटले, औषध साठाही पुरेसा असल्याचा दावा त्यांनी केला. कर्मचारी आणि डॉक्टर कमी असल्याचे मान्य करत तशा आशयाचा अहवाल आपण मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले. या वेळी त्यांच्या समवेत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ्य नागेश चव्हाण यांची उपस्थिती होती. या वेळी महिला कर्मचार्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणार्या अपमानास्पद वागणुकीबाबत तक्रारही केचल्याचे सांगण्यात येते.
अन् नव्या जिल्हा शल्यचिकित्सकांना जगतापांनी विचारला जाब
आज सकाळी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी शिष्टमंडळ आणि काही रुग्णांच्या नातेवाईकांसह नूतन जिल्हा शल्यचिकित्सक अशोक बडे यांची भेट घेऊन रुग्णांना तुम्जही बाहेरून औषधे आणायला कशामुळे सांगतात, काही रुग्णांची वैद्यकीय कागदपत्रे त्यांच्या नातेवाईकांना मिळत नाहीत, याबाबत विचारणा केली आणि नूतन जिल्हा शल्यचिकित्सक बडे
यांनी किमान पंधरा दिवसात कोणत्याही रुग्णांना बाहेरून कोणतेही औषधी आणावी लागणार नाहीत याची दक्षता घेऊन जी औषधे नाहीत ती जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून खरेदी करण्यात येईल आणि कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांना शिस्तही लावण्यात येईल, असे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले.