जिल्हा रुग्णालयात राडा, शवविच्छेदन रोखले
बीड (रिपोर्टर) प्रेम प्रकरणातून एका 22 वर्षीय तरुराने मुलीला पळवून नेल्याची घटना घडली. त्यानंतर दोघांनाही पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी परत आणले. तो वादही मिटला. मात्र काल त्या वादाला पुन्हा तोंड फुटले अन् भरदुपारी तरुणाची भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना काल दुपारी चार वाजता घडली.
संदर साहेबराव कसबे (वय 22 वर्षे रा. पिंपळादेवी) या तरुणाने एका मुलीला काही दिवसांपुर्वी पळवून नेले होते. त्यानंतर पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी त्यांना वापस आणून हे प्रकरण मिटवले. मात्र काल या वादाला पुन्हा तोंड फुटले. काल चार वाजता सुंदर कसबे हा पिंपळादेवी फाट्यावर आला असता तेथे त्याला मुलीच्या नातेवाईकांनी मारहाण केली आणि एका धारदार शस्त्राने पोटात वार करून त्याचा खून केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला. दुपारी उशिरापर्यंत या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. मात्र पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोप योगेश केरबा मांजरे, काजल योगेश मांजरे (दोघे रा. कवडगाव), बाबासाहेब शिवाजी चांदणे, रेखा बाबासाहेब चांदणे (दोघे रा. लऊळ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शवविच्छेदना दरम्यान नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात राडा केला. त्यानंतर पोलीसांनी मध्यस्थी करत दुपारी उशीरा शवविच्छेदन करण्यात आले.