दोन ट्रॅक्टरसह वाळू जप्त; पंकज कुमावतांची कारवाई
बीड/गेवराई (रिपोर्टर) गोदापात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरूच आहे. खामगाव,सावरगाव हद्दीतील गोदापात्रातून रात्रंदिवस वाळूउपसा सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी आपले पथक तेथे पाठवले असता दोन ट्रॅक्टर आणि वाळू या पथकाने जप्त केली. ही कारवाई आज सकाळी 7.45 वाजता करण्यात आली.
‘
गेवराई तालुक्यातील खामगाव सावरगाव येथील गोदापात्रातून वाळूउपसा करून त्याची वाहतूक भरदिवसा होत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांना येथील नागरिकांनी दिली होती. त्यांनी तात्काळ आपल्या पथकातील पोलिस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, राज वंजारे, संजय टुले यांनी गेवराई तहसिल कार्यालयातील मंडळ अधिकारी व तलाठी यांना सोबत घेवून गेवराई तालुक्यातील खामगाव सावरगाव याठिकाणी धाडी मारल्या. यावेळी त्यांना वाळू घेवून जाणारा एक ट्रॅक्टर मिळाला तर पथकाला पाहताच एका ट्रॅक्टरने वाळू खाली करून तो पळून जात असताना पोलिसांनी तो ताब्यात घेतला. दोन्ही ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले.