माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥
काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ।
गणेश सावंत
मो. नं. 9422742810
राजकारणाच्या सत्ताकारणात महत्वाकांक्षी व्हायचं असेल, विजयी पताका फडकवयाची असेल, आपलेच हक्क दाखवायचे असतील तर असा गेम खेळा की स्वकियांसह परकियांच्या पायाखालची वाळू सरकली पाहिजे. राजकारणाचा आखाडा असो की, युद्धभूमी असो, शत्रुला आपला तळ लागता कामा नये. त्यासाठी शत्रुच्या काफिल्यात कायम अस्थिरता निर्माण करा. हे राजकारणाच्या आखाड्यातले आणि युद्धभूमीतले बेरजेचे गणित आहे. म्हणूनच आम्ही भाजपाचे सर्वोच्च नेते मोदी-शहा यांच्या बाबत सातत्याने म्हणतो, ‘शेतात काय पिकतय यापेक्षा बाजारात बाजारात काय विकतय’ याला या दोघांकडून अधिक महत्व दिलं जातं. त्याचा प्रत्यय पुन्हा काल महाराष्ट्राच्या राजकारणात आला. उभ्या देशाने पुन्हा एकदा मोदी-शहांचे धक्कातंत्र अनुभवले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या एक तासापर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे छातीठोकपणे ‘पुन्हा येईन’ म्हणणारे देवेंद्र फडणवीस होतील, असे वाटत असतानाच दस्तुरखुद्द देवेंद्रांना एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री म्हणून नावाची घोषणा करावी लागली. त्यामुळे इथे
‘नाथ’ कोण ‘अनाथ’ कोण?
हा सवाल उपस्थित झाला. गेल्या दहा दिवसांच्या कालखंडात महाराष्ट्रात जे राजकीय वादळ उठलं त्या वादळात शिवसेनेसारखी ठाकरेंची संघटना अक्षरश: उद्ध्वस्त झाली. शिवसैनिक असलेल्या एकनाथ शिंदेंनी बंड केलं अन् 39 आमदारांना सोबत घेऊन आपणच खरे शिवसेनेचे ‘नाथ’ हे एकनाथांनी उभ्या महाराष्ट्राला नव्हे देशाला दाखवून दिले. इथं ठाकरेंची मातोश्री अनाथ झाली. उद्धव ठाकरे जे की ‘नाथ’ म्हणून वर्चस्व गाजवत होते ते ‘अनाथ’ झाले. दुसरीकडे जेव्हा बंडखोरांच्या मदतीने महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपा लपून-छुपून बंडखोरांना रसद पुरवत होती ती परवा उघडउघड रसद पुरवण्याइरादे समोर आली. मुख्यमंत्री ठाकरेंनी राजीनामा देताच देवेंद्र फडणवीसांनी उत्सव साजरा केला. एकमेकांना पेढे खावू घातले. हा फडणवीसांचा आनंद दिर्घकाळ टीकू शकला नाही. अवघ्या चोवीस तासात मोदी-शहांच्या जोडगोळीने महाराष्ट्राच्या राजकारणात असे काही समीकरण बदलून टाकले की, कित्येकांना अनाथ करत स्वत:च ‘नाथ’ होऊन बसले. कालपर्यंत ‘मी पुन्हा येईल… मी पुन्हा येईल’ म्हणत महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा मुकुट शिरपेचात घेण्याचे स्वप्न पाहणार्या देवेंद्र फडणवीसांना मोदी-शहांनी जबरदस्त झटका दिला अन् फडणवीसांच्या तोंडी सह्याद्रीच्या सिंहासनाचा ‘नाथ’ ‘एकनाथच’ ही घोषणा करावयास भाग पाडले. या वेळी फडणवीसांनी आणखी एक चाल खेळली, ‘मी मंत्रिमंडळात नसणार, बाहेरून सरकारवर लक्ष ठेवणार’, असं स्पष्ट केलं. म्हणजेच मंदिर बांधले, मात्र त्या मंदिरात स्वत: पुजारी न होता फडणवीस देव बनून राहण्याच्या इच्छाशक्तीत राहिले अन् इथच मोदी-शहांनी स्वत:चं देवपण दुसर्याला द्यायचं नाही हे पुन्हा एकदा देशाला दाखवून देत देवेंद्र उपमुख्यमंत्रीपद स्वीकारा, असा स्पष्ट आदेश दिला. या वेळी देवेंद्र ते नाकारू शकले नाहीत. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीच करायचं होतं तर ते 2019 च्या निकाला दरम्यानही करता आलं असतं परंतु इथं
सवत रंडकी झाली पाहिजे
हा अट्टाहास आणि राजकारणातला अभेद इच्छावाद केंद्रिय भाजपाला सोडता आला नाही. म्हणूनच नवरा मेला तरी चालेल, परंतु सवतीचं कपाळ पांढरं दिसावं, या भूमिकेत भाजपाने पत्ते टाकले. 2014 च्या निवडणुका वेगवेगळ्या लढून सेना-भाजपाने एकमेकांचे लक्तरे वेशीला टांगलेच होते, पुन्हा ते एकत्रित आले. 2019 ला एकत्रित निवडणुका लढले. इथे शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात काय ठरले, हे देव जाणो परंतु प्रत्यक्षात निवडणुकीचे निकाल आल्यानंतर शिवसेना अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदावर अडून राहिले. भाजप त्यांना मुख्यमंत्रीपद देण्याच्या तयारीत नव्हते, अक्षरश: युती तुटली अन् महाराष्ट्रात तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यानंतर अडीच वर्षे ते चालले. भाजपाने सरकार पाडण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, सरशेवटी शिवसेना फोडण्यात यश आले. इथपर्यंत सर्वकाही सर्वांना ज्ञात आहे, प्रश्न हाच… आज एकनाथ शिंदेंच्या हाती सत्ता दिली मग भाजपाने 2019 सालीच अडीच वर्षासाठी शिवसेनेकडे सत्ता का दिली नाही? तर त्याचं उत्तर खर्या अर्थाने आता सापडेल. तेव्हा सत्ता दिली असती आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर एकनाथ शिंदेंचं रिमोट हे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हातात असतं. आता मात्र एकनाथ शिंदेंचं रिमोट ना उद्धव ठाकरेंच्या हाती ना फडणवीसांच्या हाती हे रिमोट थेट मोदी-शहांच्या हातात असणार आहे. वा, काय खेळी आहे! आजपर्यंत मुरब्बी राजकारणी आणि योद्धे हे विरोधकांच्या गोटात अस्थिरता ठेवायचे, इथे तर स्वत:च्या गोटातही अस्थिरता ठेवण्यात मोदी-शहा यशस्वी ठरले. काल महाराष्ट्रात जे काही नाट्यमयरित्या घटनाक्रम घडला त्याचे वर्णन
माकडी मुठीशी धरिले फुटाणे…
हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंगासारखेच म्हणावे लागेल. चार चरणाच्या या अभंगात महाराज म्हणतात….
माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥
काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ।
शुकें नळिकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ।
तुका म्हणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव कांहीं तेथें ।
या अभंगाचा अर्थ असा, ‘एखादा शिकारी माकडांना पकडण्यासाठी छोट्या तोंडाच्या मढक्यात फुटाणे टाकतो, माकड जेव्हा ते फुटाणे घेण्यासाठी मढक्यात हात टाकतो, मुठ आवळतो तेव्हा त्याचा हात मढक्यातून बाहेर निघत नाही. माकडाला फुटाण्याची हाव असते, मुठ सोडावी तर फुटाणे मिळणार नाहीत, या लोभापायी तो निर्बुद्ध होतो, शिकार्याची चाहुल लागत नाही आणि ते माकड अलगद जाळ्यात अडकते. ‘शुकें नळिकेशी गोवियेले पाय’ म्हणजेच ‘पोपट ज्या फिरणार्या नळीवर बसतो तो लोभापायी तो पक्षी आहे त्याला उडता येतं,’ हे त्याक्षणी तो विसरलेला असतो म्हणूनच तो शिकार होतो. इथंही एकनाथ शिंदेंना मढक्यातले फुटाणे आवडले अन् देवेंद्रांना नळीवर बसण्याचा आत्मविश्वास नडला. हे जेवढे सत्यस्थितीतले महाराष्ट्रकथन आहे तेवढेच आगामी काळातले राजकारणासाठीचे
हिंदुत्वाचे महत्व
या मोदी-शहांच्या तिरक्या चालीतही आहे. हेही दुर्लक्षीत करून चालणार नाही. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा आहे, शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे, इथं कडवट हिंदुत्वाबरोबर बहुजन विचारसरणी अधिक रुजलेली आहे. इतिहासाच्या पानातलं काहींचं संभाजी महाराजांचं हिंदुत्व अन् छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य पुढं करत जो तो इथं राजकारण करतो अन् आम्हीच खरे हिंदुत्ववादी असल्याचे दाखवतो. त्या हिंदुत्वात आता आणखी एका गटाची भर पडली. आधी भाजप स्वत:च्या हिंदुत्वावर सत्यत्वाची मोहर लावायचा तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आम्हीच खरे हिंदुत्ववादी असल्याचे छातीठोकपणे सांगायचे. आता आम्ही शिवसेनाप्रमुख आणि स्व. आनंद दिघे यांचे पाईक आहोत आणि आमचच खरं हिंदुत्व, त्या हिंदुत्वासाठीच आम्ही बंड केलं हे दाखवत एकनाथ शिंदेंचा गटही हिंदुत्वावर महाराष्ट्रात मत मागणार. मग अशा वेळी मोदी-शहांनी आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जे राजकारण केलं आणि सत्ताकारणाला काहीसं अलगद बाजुला ठेवलं ते एवढ्यासाठीच.
आता
महाराष्ट्राचं हित कशात?
हे पाहणं खरं तर नुतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे आव्हान असणार आहे. आपण कोणाचे हातचे बाहुले होणार नाहीत, याची दक्षता घेणंही एकनाथ शिंदेंसमोर आव्हानच ठरणार आहे. महाराष्ट्रातले अनेक प्रश्न आहेत, मराठा आरक्षण’, ‘ओबीसी आरक्षण’, ‘धनगर आरक्षण’, ‘मुस्लिम आरक्षण’, ‘बेरोजगारी’ ‘आरोग्य सेवा’, ‘शिक्षण’, ‘शेतकर्यांच्या आत्महत्या’ ‘लोकांच्या मुलभूत गरजा’, आता फक्त शिंदे याकडे लक्ष देतात की कोणाचं रिमोट होऊन कोणाला अनाथ आणि कोणाला नाथ बनवण्यात धन्यता मानतात हा येणारा काळ ठरवणार.