गावकर्यांच्या तक्रारीनंतर दोन ट्रॅक्टर जप्त; तोडपाणी न करता वाळू माफियांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गेवराई/बीड (रिपोर्टर) वाळू माफियांच्या वाळू उत्खननाने पडलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामध्ये बुडून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गेल्या काही दिवसांपुर्वी तालुक्यातील शहाजानपूर चकला येथे घडली होती. या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाने घेऊन या भागात वाळू उपसा करणार्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते, मात्र त्यानंतरही वाळू माफिया शहाजानपूर चकला येथील नदी पात्रात वाळूचे उत्खनन सर्रासपणे करत असल्याने आज गावकर्यांनी याविरुद्ध महसुल आणि पोलिसांना कळवल्यानंतर दोन ट्रॅक्टर वाळू घेऊन जाताना पोलिसांनी ताब्यात घेऊन ते मादळमोही येथील पोलीस चौकीत लावले. सदरचा प्रकार गंभीर असून तोडीपाणी करून सोडून न देता संबंधित माफियांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी गावकर्यांनी केली.
गेल्या काही दिवसांपुर्वी गेवराई तालुक्यातील शहाजानपूर चकला येथील नदीपात्रामध्ये वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्यामध्ये बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने अवघा जिल्हा शोकाकुल होत वाळू माफियांविरुद्ध संतापला. जिल्हाधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली, वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. वाळूची तस्करी होत असेल तर तात्काळ कळवण्याच्या सूचना गावकर्यांना दिल्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याच भागात अवैधपणे वाळुचा उपसा केला जात आहे. ट्रॅक्टरने सर्रासपणे रोज शेकडो ब्रास वाळू नदीपात्राबाहेर नेली जात आहे. वाळू उपसा करण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात येत आहे. आज शहाजानपूर चकला येथील गावकर्यांनी थेट महसूल अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला याची माहिती दिली. पोलीस नेहमीप्रमाणे आले, दोन ट्रॅक्टर जप्त करून घेऊन गेले, मात्र गावकरी पोलिसांच्या या कारवाईवर समाधानी नाहीत. याअगोदरही ट्रॅक्टर पकडले परंतु तोडीपाणी करून सोडून दिले, असा आरोप गावकर्यांचा आहे. आता या प्रकरणात वाळू माफियांवर गुन्हा दाखल करून पुन्हा या भागात वाळू उपसा होणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासनासह महसुल प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी गावकर्यांच्या वतीने करण्यात येत आहे. वाळू माफिया हा स्थानिकचाच उपसरपंच असल्याचे सांगण्यात येते.