बीड (रिपोर्टर) बीड पंचायत समितीच्या जुन्या इमारतीमध्ये रोजगार हमीच्या फाईली ठेवण्यात आलेल्या होत्या. सदरील या फाईली चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला असून याची माहिती पं.स.कार्यालयातील कर्मचार्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर शिवाजीनगर ठाण्याचे राठोड व पं.स.चे गटविकास अधिकारी सानप घटनास्थळी दाखल झाले होते.
बीड पंचायत समिती अंतर्गत गेल्या एक दोन वर्षामध्ये अनेक रोहयोची कामे झाली आहेत. या कामाच्या सर्व फाईली जुन्या इमारतीमध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या. यात मोजमाप पुस्तिका, हजेरी पत्रक, प्रशासकीय खर्चाचे सर्व उपप्रमाणके, मस्टर टँकर नोंद वही, तांत्रिक मान्यता संचिका यासह आदि फाईलींचा समावेश होता. या फाईली चोरीला गेल्याचे आज सकाळी निदर्शनास आले आहे. खिडकीचे गज काढून अज्ञात चोरट्याने फाईली चोरून नेल्या आहेत. हा प्रकार पं.स.चे कक्षप्रमुख डोंगरे, कदम आणि कुलकर्णी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान जुन्या बोगस कामांची चौकशी होणार असल्यामुळेच फाईलींची चोरी झाली असल्याचेही चर्चा होत आहे.