बीड (रिपोर्टर): सत्तेत मी काटा आहे, मला कधीही अटक होण्याची शक्यता आहे, त्याबाबत अहवाल देखील तयार करण्यात आल्याचा दावा करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना न टिकणारे दहा टक्के आरक्षण देण्यात आल्याचे सांगितले. ते आरक्षण आम्ही स्वीकारावे म्हणून जाणीवपुर्वक आमच्यावर गुन्हे दाकल करणे सुरू आहे, असे कितीही गुन्हे दाखल केले अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी मराठे एक इंचही मागे हटणार नाहीत. समाजाने मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याचे जे मनसुबे आखले आहेत ते इतरांना आडवे करण्यासाठीच मराठ्यांनी हा निर्णय घेतल्याचे जरांगे यांनी सांगून समाजाचा निर्णय हा अंतिम राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बीड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जसजसं मराठ्यांवर दडपशाही, दहशत निर्माण होत आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षाही ताकदीने लोक यायला लागलेत. माझ्या फक्त बैठकीला 40-50 हजारापेक्षा कमी लोक नाहीत. सरकारनं दिवसाढवळ्या फसवणूक आणि धुळफेक केली. त्यामुळे मराठा समाज ताकदीने पेटून उठला आहे. आम्ही आणखी काही दिवस किती अन्याय करतायेत हे बघतोय. चौकशी सुरू आहे की नाही याची माहिती नाही. माझ्याकडे कुणी आले नाही. मी बाहेर आलोय, कदाचित चौकशी अहवाल तयार झाला असेल. मला अटक करणार हे एकाने सांगितले. मराठा आणि सत्तेच्या मधला मी काटा आहे त्यामुळे हा काटा काढल्याशिवाय पर्याय नाही असं सरकारला वाटते असा आरोप त्यांनी केला. तसेच माझ्याविरोधात अहवाल तयार झाला आहे. आम्ही न टिकणारे 10 टक्के आरक्षण घेत नाही म्हणून गुन्हा नोंदवले जातायेत. सरकारने दिलेले आरक्षण टिकणार नाही. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. तुम्हाला मराठा काय आहे हे थोडं थांबा, दिसेल. माझा मालक समाज आहे. मुलगा म्हणून मी काम करतोय. सगळे बरबटलेले आहेत, त्यामुळे मातब्बर कोण आहे? मराठा समाज हजारोने उमेदवारी अर्ज भरणार आहे. शेवटी मराठ्यांनी डाव टाकलाच असं सांगत जरांगेंनी लोकसभा मतदारसंघात शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत भाष्य केले आहे.
दरम्यान, माझा अधिकार हिसकावून घ्यायला लागलेत. ज्यावेळी माणूस धुंदीत असतो तेव्हा काय करतो हे लक्षात येत नाही. गोरगरिब मराठ्याने पोस्ट टाकली, गुन्हे दाखल करायचे. दबाव, दडपशाही कितीही टाकली तरी एक इंचही मराठे मागे हटत नाहीत. राज्यभरात बैठक घेतोय. पण बैठकीला हजारो, लाखो मराठे येतायेत. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतायेत. मराठ्यांच्या लेकरांसाठी ते घ्यायला तयार आहे. मी समाजासाठी जीवाची बाजी लावतोय. आम्ही रुपयाही देऊ शकलो नाही तरीही लोकांच्या मनात खोलवर रुजलोय असंही जरांगे पाटील म्हणाले.