बकरी ईदनिमित्त ईदगाहसह जिल्ह्यातील प्रमुख मस्जिदींमध्ये सामूहिक नमाज अदा
बीड (रिपोर्टर) ईद-उ-जुहा (बकरी ईद) निमित्त आज ईदगाह मैदानासह शहरातील प्रमुख मस्जिदींमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आली. ईदची नमाज झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हाभरातही ठिकठिकाणी नियोजीत वेळेनुसार ईदची नमाज अदा झाली. या वेळी देशात शांती, सलोखा राहावा यासाठी दुवॉ करण्यात आली.
बीड शहरातील नाळवंडी नाका येथील ईदगाह मैदानात ईदची सामूहिक नमाज अदा करण्यात आली. या वेळी मुस्लिम बांधवांनी देशात सुख-शांती नांदावी, यासाठी दुवॉ केली. ईदची नमाज झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह डीवायएसपी संतोष वाळके यांची उपस्थिती होती. बीड शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ईद उत्साहात साजरी करण्यात आली. गेवराई, माजलगाव, आष्टी, पाटोदा, शिरूर, नेकनूर, पात्रूड, मांजरसुंबा, परळी, अंबाजोगाई, केज यासह अनेक ठिकाणी ईद उत्साहात साजरी झाली.
एसपींकडून शुभेच्छा; लोकप्रतिनिधींची गैरहजेरी
प्रत्येक वर्षी ईद-उल-फित्र व इद-उ-जुहा या दोन्ही सणांनिमित्त ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधव नमाज अदा करत असतात. याठिकाणी अल्लाहकडे दुवॉ मागत असतात. यावर्षी ईद-उ-जुहा (बकरी ईद) निमित्त ईदगाह मैदान येथे नमाज अदा करण्यात आली. प्रत्येक वर्षी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी विविध पक्ष-संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित असतात. यावर्षी मात्र लोकप्रतिनिधी, पक्ष-संघटनेचे पदाधिकारी ईदगाह मैदानावर दिसून आले नाही. जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर हे ईदगाह मैदान येथे जातीने उपस्थित होते. त्यांनी मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या मात्र लोकप्रतिनिधी यांची गैरहजेरी प्रामुख्याने दिसून आली.